जेलरोडच्या शतकभराच्या इतिहासाची साक्ष असलेली पाण्याची टाकी अखेर जमीनदोस्त; जुन्या आठवणींना उजाळा
जेलरोडच्या शतकभराच्या इतिहासाची साक्ष असलेली पाण्याची टाकी अखेर जमीनदोस्त; जुन्या आठवणींना उजाळा
img
Chandrakant Barve

नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी): नाशिकरोडमधील जेलरोड परिसराची ओळख बनलेली, जवळपास शंभर वर्षांचा इतिहास लाभलेली ब्रिटिशकालीन पाण्याची टाकी अखेर जमीनदोस्त करण्यात आली.

वापराअभावी धोकादायक झालेल्या या टाकीचे नाशिक महानगरपालिकेच्या नाशिकरोड विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने पाडकाम केले. मात्र, टाकीचे अस्तित्व संपले असले तरी "टाकी" हे नाव आणि त्याच्याशी निगडित असंख्य आठवणी पुढील अनेक वर्षे कायम राहणार आहेत.

सन १९२७ च्या सुमारास ब्रिटिशकालात नाशिकरोड येथे मध्यवर्ती कारागृह उभारण्यात आले. कारागृह आणि त्यालगतची पोलीस वसाहत यांना पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे दहा लाख लिटर क्षमतेची भव्य उंच पाण्याची टाकी बांधण्यात आली होती. त्याकाळातील ही टाकी अभियांत्रिकीचा उत्तम नमुना मानली जात होती.

मध्यवर्ती कारागृहामुळे या परिसराला "जेलरोड" हे नाव मिळाले, तर पाण्याची टाकी हा परिसराचा प्रमुख लँडमार्क बनला. त्या काळात मोबाईल किंवा आधुनिक दिशादर्शक साधने नव्हती. त्यामुळे परिसरातील नागरिक एकमेकांना "टाकीवर भेटू", "टाकीजवळ ये" किंवा "टाकीसमोर थांब" असे सांगत असत. त्यामुळे "टाकी" ही केवळ पाण्याची रचना नव्हती, तर संपूर्ण जेलरोड परिसराचे मध्यवर्ती ओळखचिन्ह होती.

काळाच्या ओघात पाणीपुरवठ्याच्या आधुनिक व्यवस्था उभ्या राहिल्यानंतर या टाकीचा वापर बंद झाला. अनेक वर्षे दुर्लक्षित राहिल्याने ती जीर्ण आणि धोकादायक बनली होती. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी अखेर नाशिक महानगरपालिकेच्या नाशिकरोड विभागाने तिचे पाडकाम केले.

टाकी पाडण्यात आल्यानंतर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. अनेकांच्या बालपणापासून तरुणपणापर्यंतच्या असंख्य आठवणी या टाकीशी जोडलेल्या आहेत. परिसराचा पत्ता सांगताना किंवा एखाद्या ठिकाणाची ओळख करून देताना "टाकी" हा शब्द सहजपणे वापरला जात असे. त्यामुळे ही टाकी नाशिकरोडच्या सामाजिक आणि सांस्कृतिक स्मृतींचा अविभाज्य भाग बनली होती.

आज ब्रिटिशकालीन या वास्तूचे अस्तित्व संपले असले, तरी "टाकी" हे नाव इतिहासात आणि नागरिकांच्या स्मरणात कायम राहणार आहे. जेलरोडचा इतिहास सांगताना मध्यवर्ती कारागृह आणि त्यासोबत उभारण्यात आलेल्या या ऐतिहासिक पाण्याच्या टाकीचा उल्लेख भविष्यातही तितक्याच अभिमानाने केला जाईल. तिचे पाडकाम हा केवळ एका जुन्या संरचनेचा शेवट नसून, नाशिकरोडच्या शतकभराच्या वारशातील एक महत्त्वाचे पान इतिहासजमा झाल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group