नाशिक - नाशिकच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने नाशिक विभागात वीस हॉटेल व आस्थापनांच्या कामाची तपासणी केली असून त्यामध्ये सात हॉटेलचे परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले तर दोन हॉटेल व्यवसायिकांना सुधारणा करण्याची संधी देऊनही न केल्याने त्यांचेही परवाने निलंबित करण्यात आले आहे, चार ठिकाणी परवानगी न घेताच व्यवसाय सुरू असल्याचे लक्षात आल्याने ते हॉटेल देखील तत्काळ बंद करण्यात आले आहे.
मागील काही दिवसापासून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने विविध प्रकारच्या कारवाया सुरू आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यानंतर या कारवायांमध्ये वाढ होत आहे. 19 जून रोजी स्वतः राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी नाशिकच्या दूध बाजारमध्ये भल्या पहाटे छापा टाकून तपासणी केली होती. राज्यामध्ये हॉटेल तपासणीची मोहीम आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केली आणि त्यानंतर नाशिक मध्ये देखील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या उत्तर महाराष्ट्र कार्यालयाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे.
या बाबत अन्न व औषध प्रशासन विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की, वारंवार सूचना देऊनही तात्काळ कारवाई करण्यास सांगितलेली होती. पण कोणतीही सुधारणा न केल्यामुळे धुळे येथील मेडिकल कॉलेजमध्ये असलेले गजानन कॅन्टीन आणि भुसावळ येथील साके नाका येथील हॉटेलचे यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
मोहिमेअंतर्गत तपासणी करताना आणि ग्राहकांच्या तक्रारी तसेच कोणतेही नियम न पाळणे यामुळे नाशिक शहरातील द्वारका परिसरात असलेले हॉटेल राधिका, पंचवटी परिसरात असलेले पेट्रोल जवळील क्राऊन पॅलेस, जत्रा लिंक रोडवरील ग्रीन वॉल, सिन्नर मधील लक्ष्मी या हॉटेलबरोबरच जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसी रोडवर असलेले त्रिमूर्ती, तसेच जळगाव जिल्ह्यातील भानू आणि नंदुरबार येथील जाधव रेस्टॉरंट यांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आलेले आहेत. तपासणी करत असताना चार हॉटेल कोणतेही परवाने न घेता सुरू असल्याचे लक्षात आल्याने तत्काळ ते हॉटेल बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
"या" कारणांमुळे परवाने केले निलंबित
तपासणीदरम्यान स्वयंपाकघरातील गंभीर अस्वच्छता, निकृष्ट दर्जाची शीतकरण यंत्रणा, अत्यंत अस्वच्छ वातावरणात उघड्यावर ठेवलेले कच्चे अन्न, कार्यरत कर्मचाऱ्यांचा वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव तसेच या आस्थापनांकडे आवश्यक कागदपत्रांचा अभाव, कार्यरत कर्मचाऱ्यांची कोणतीही वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली नसणे, ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी यंत्रणा नसणे, या तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ आणि त्याअंतर्गत विविध नियम व विनियामांचे उल्लंघन या कारणांमुळे वरील आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले.
अन्न व औषध प्रशासन विभागाने हॉटेलवर केलेल्या या कारवाईमुळे चांगलीच खळबळ उडाली असून हॉटेल व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.