येवला (दीपक सोनवणे) :-येवल्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.
एकीकडे विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज असताना, दुसरीकडे येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात लाचखोरीचा एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयातील मुख्य लिपिक, सुधीर वाघ याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या सावकारी परवान्याचे नूतनीकरण करून देण्यासाठी मुख्य लिपिक सुधीर वाघ याने ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही रक्कम स्वीकारत असतानाच एसीबीच्या पोलीस उपाधीक्षक स्वाती पवार यांच्या मार्गदर्शनाखालील या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.
विशेष म्हणजे, ज्या तहसील कार्यालयात आज विधान परिषद निवडणुकीचे मतदान सुरू होते, त्याच परिसरात हा प्रकार घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, या कारवाईमुळे शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.