नाशिकरोड प्रभाग सभापतींच्या दालनात नव्या वादाला फुटले तोंड
नाशिकरोड प्रभाग सभापतींच्या दालनात नव्या वादाला फुटले तोंड
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- नाशिकरोड येथील महापालिका विभागीय कार्यालयातील प्रभाग सभापती दालनात शिवसेना पक्षाचे नाव व धनुष्यबाण चिन्ह लावण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

या प्रकरणावर शिवसेना (उबाठा) गटाने आक्षेप नोंदवत संबंधित फलक तातडीने हटविण्याची मागणी केली असून, दुसरीकडे प्रभाग सभापती रमेश धोंगडे यांनी हा प्रकार तात्पुरत्या स्वरूपातील व्यवस्था असल्याचे स्पष्ट केले आहे.

नुकत्याच झालेल्या प्रभाग सभापती कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात दालनात शिवसेना नावासह धनुष्यबाण चिन्ह असलेले फलक लावण्यात आले होते. यानंतर विरोधकांनी मनपा प्रशासनाच्या तटस्थतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाराजी व्यक्त केली आहे.

शिवसेना (उबाठा) गटाचे गटनेते केशव पोरजे यांनी सार्वजनिक व संविधानिक स्वरूपाच्या कार्यालयात कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव अथवा चिन्ह लावणे अयोग्य असल्याचे सांगितले. “महापालिका कार्यालय हे सर्वसामान्य नागरिकांचे आहे. अशा ठिकाणी कोणत्याही पक्षाचे नाव अथवा चिन्ह लावणे चुकीचे आहे. संबंधित चिन्ह आणि नाव तातडीने हटवावे, अन्यथा शिवसेना (उबाठा)तर्फे आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, प्रभाग सभापती रमेश धोंगडे यांनी या वादावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, “प्रभाग कार्यालयाच्या नूतनीकरण करताना  मनपाचे अधिकृत बोधचिन्ह उपलब्ध नव्हते. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात मोकळ्या जागी पक्षाचे नाव व चिन्ह लावण्यात आले. मनपाचे बोधचिन्ह उपलब्ध झाल्यानंतर ते हटविण्यात येईल. त्यामुळे हा वादाचा विषय नाही.”

या प्रकरणामुळे नाशिकरोड परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले असून, उद्घाटनावेळी लावण्यात आलेले पक्षचिन्ह तात्पुरते होते की जाणीवपूर्वक, याबाबत विविध तर्कवितर्क रंगू लागले आहेत. आता मनपा प्रशासन यावर नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group