नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी) : सरकारी मालमत्तेवर डल्ला मारणाऱ्या आंतरजिल्हा चोरट्यांच्या टोळीचा नाशिकरोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पर्दाफाश करत चार जणांना अटक केली आहे. भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कंपनीची भूमिगत केबल चोरणाऱ्या या टोळीकडून पोलिसांनी चोरीसाठी वापरण्यात आलेला जेसीबी, मालवाहू टेम्पो तसेच चोरीचा मुद्देमाल असा एकूण १ कोटी ५ लाख रुपयांचा शंभर टक्के मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे, केबलमधून गळालेल्या ऑईलच्या खुणांमुळे या चोरीचा उलगडा होण्यास पोलिसांना मोठी मदत झाली.
पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, ३० मे रोजी रात्री ८ ते ३१ मे रोजी सकाळी १० वाजेदरम्यान नाशिक रोड येथील बिटको चौक परिसरातील संजय मेडिकलसमोरील बीएसएनएलच्या भूमिगत केबलची चोरी करण्यात आली होती. अज्ञात चोरट्यांनी बीएसएनएलचे सिमेंट चेंबर उघडून त्यामधील सुमारे ३५ लाख रुपये किमतीची भूमिगत केबल यंत्राच्या सहाय्याने ओढून कापून नेली होती. याप्रकरणी बीएसएनएलचे अधिकारी बाळासाहेब दत्तात्रेय कोटकर यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासाला गती देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार १ जून रोजी रात्री सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि त्यांचे गुन्हे शोध पथक बिटको चौक ते लॅम रोड परिसरात गस्त घालत असताना एक संशयास्पद मालवाहू टेम्पो पोलिसांची गाडी पाहून भरधाव वेगाने पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले. संशय बळावल्याने पोलिसांनी पाठलाग करून टेम्पो अडविला.
टेम्पोची तपासणी करत असताना मागील बाजूने ऑईल गळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. केबल कापताना बाहेर पडलेले हेच ऑईल संशय अधिक गडद करणारे ठरले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये बीएसएनएल केबलचे तुकडे आढळून आले. पुढील तपासात ही चोरी करण्यासाठी जेसीबी मशीनचा वापर करण्यात आल्याचे उघड झाले.
या प्रकरणात वाहाब अब्दुल नवाज (वय ३५, रा. भांडुप, मुंबई), सुरेश दिलीप वैराळ (वय ३७, रा. भांडुप, मुंबई), बसंतलाल राजाराम यादव (वय ३८, रा. चेंबूर, मुंबई) आणि कमलेशकुमार सुखदेव रविदास (वय २६, रा. नवाजा, बिहार) या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून, त्यांनी यापूर्वी अशाच प्रकारचे गुन्हे इतर ठिकाणी केले आहेत का, याचा तपास सुरू आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे आणि सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) अतुल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस हवालदार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव तसेच पोलीस शिपाई अरुण गाडेकर, रोहित शिंदे आणि योगेश रानडे यांनी विशेष परिश्रम घेत महत्त्वाची भूमिका बजावली.