सिडको (प्रतिनिधी) : तब्बल साडेचार वर्षांनंतर झालेली महापालिका सिडको विभागाची पहिलीच प्रभाग सभा पाण्याच्या प्रश्नावरून चांगलीच गाजली.
नवनिर्वाचित नगरसेवकांनी पिण्याच्या पाण्याच्या समस्येवरून संताप व्यक्त केला. उत्तमनगर परिसरात चार दिवस उलटूनही पाणीपुरवठा होत नसल्याने सभागृहाच्या प्रवेशद्वारावर नगरसेवकांसह महिलांनी आंदोलन केले. तर प्रभाग सभेतच दोन नगरसेवकांमध्ये महिला नगरसेवकांसमोर खालच्या पातळीवर शाब्दिक चकमक झाली.
नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना गढूळ पाण्याच्या बाटल्या देत प्रभागातील विविध समस्या मांडल्या. अधिकाऱ्यांनी त्यावर उत्तरे दिल्यानंतर सभापतींनी संबंधित समस्या तातडीने सोडविण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे सिडको विभागाची पहिलीच प्रभाग सभा वादळी ठरली.
मनपा सिडको प्रभाग समितीची सभा सभापती बाळकृष्ण शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. सभेसाठी नगरसेवक सभागृहात जात असतानाच भाजपाचे नगरसेवक भूषण राणे यांनी प्रवेशद्वाराजवळच प्रभागातील महिलांसह पिण्याच्या पाण्यासाठी घोषणाबाजी करत आंदोलन केले. अखेर विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे व पाणीपुरवठा अधिकारी हेमंत पठे यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
प्रभाग सभा सुरू झाल्यानंतर नगरसेविका साधना मटाले यांनी अधिकाऱ्यांना गढूळ पाण्याच्या बाटल्या दाखवत समस्या मांडली. यावेळी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी हस्तक्षेप केल्याने नगरसेवक सुधाकर बडगुजर व शहाणे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. यावेळी दोघांनीही भर सभागृहात महिला नगरसेवकांसमोर एकमेकांना शिवीगाळ केल्याने उपस्थितांना धक्का बसला.
सभेत नगरसेविका कविता नाईक यांनी प्रभागातील ड्रेनेज लाईनमध्ये पिण्याच्या पाण्याची लाईन जात असल्याने गढूळ पाणी येत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. नगरसेवक मुरलीधर भामरे यांनी प्रभागातील उद्यानांची अवस्था बिकट झाल्याचे सांगत संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी केली. नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी पाणी समस्येवर उपाययोजना सुचविल्या. नगरसेविका पल्लवी गणोरे यांनी वाढत्या ड्रेनेज तक्रारी आणि रस्त्यांच्या खराब अवस्थेकडे लक्ष वेधले. किरण दराडे यांनी राजे छत्रपती संभाजी स्टेडियमच्या दुरवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केला.
प्रतिभा पवार यांनी प्रभागासाठी गेल्या सतरा वर्षांपासून पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे; मात्र ती अद्याप कोरडीच असल्याचे सांगितले. तसेच वालमनमुळे पाणीपुरवठा ठप्प होत असल्याकडे लक्ष वेधले. वैशाली दळवी यांनी पाण्याच्या समस्येवर भाष्य करताना तीन-तीन दिवस पाणी येत नसल्याचे सांगितले. चेतना नगरमध्ये दोन टाक्या असून त्यापैकी एक कायम कोरडी राहत असल्याचे तसेच टँकर वेळेवर येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रभाग सभेची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर सभागृहात ‘गर्जा महाराष्ट्र’ गीताचा आवाज घुमल्याने काही काळ आगळे-वेगळे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी नगरसेवक नितीन दातीर, माधुरी डेमसे, प्रवीण तिदमे, सुवर्णा मटाले, डॉ. योगिता हिरे, प्रियंका दोंदे, छाया देवांग, डॉ. पुनम महाले आदींनी सहभाग घेतला. सदस्यांनी सुचविलेली कामे तातडीने करण्याच्या सूचना सभापती शिरसाठ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
आधी शिव्यांची लाखोली, नंतर दिलगिरी
प्रभाग सभा सुरू झाल्यानंतर काही वेळातच नगरसेवक सुधाकर बडगुजर व मुकेश शहाणे यांच्यात भर सभागृहात जोरदार शाब्दिक चकमक झाली. एकीकडे महिला नगरसेवक वटपौर्णिमेची पूजा करून सभागृहात आल्या होत्या. त्यांच्या समोरच वाद सुरू झाल्याने त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.नंतर दोन्ही नगरसेवकांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त केली. मात्र या प्रकाराची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती.