मालेगाव - शहरात आज सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मालेगाव शहरातील कलेक्टर पट्टा भागातील घराचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत आजीसह नातवाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडली.
विमलबाई पंढरीनाथ येवले (वय ८०) व चेतन रामचंद्र येवले (वय २०) अशी मृत आजी – नातवाची नावे आहेत. कलेक्टर पट्टा भागातील महारूद्र हनुमान मंदिराजवळ राजेंद्र येवले हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याने येवले हे काही कामानिमित्त जिन्याने घराच्या गच्चीवर जात असतांनाच या घराचा संपूर्ण स्लॅब अचानक कोसळला.
यावेळी घरात येवले यांची पत्नी, मुलगी, आई विमलबाई, मुलगा चेतन हे होते. स्लॅब अचानक पडल्याने परिसरात मोठा आवाज झाला. या आवाजाने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. याच दरम्यान नागरिकांनी महानगरपालिका व अग्नीशमन दलाला कळविले. अग्निशमन दलाचे अधिकारी संजय पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने तेथे धाव घेत मदतकार्य सुरू केले.
दरम्यान, स्लॅबखाली दबल्याने विमलबाई व चेतन गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. अग्निशमन दलाचे जवान व स्थानिक रहिवाशांनी तत्परता दाखवित मदतकार्य सुरू केल्याने घरातील अन्य तिघांचे प्राण वाचले. याघटनेचे वृत्त कळताच छावणी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सानप यांनी तेथे धाव घेतली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी मनपा भाजपा गटनेते मदन गायकवाड, नगरसेवक विनोद वाघ व अन्य कार्यकर्त्यांनी मदतकार्यात सहकार्य केले. या घटनेची माहिती उपविभागीय अधिकारी नितिन सदगीर यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.