नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी):- येथील बना नाल्यात एका ५८ वर्षीय व्यक्तीचा कमालीचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मृतदेहाजवळ मिळालेल्या कागदपत्रांवरून (जसे की ड्रायव्हिंग लायसेन्स व इतर ओळखपत्र) हा मृतदेह मुंबई येथील बेपत्ता नागरिकाचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात, याचे मोठे आव्हान आता देवळाली कॅम्प पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
२ महिन्यांपूर्वी झाली होती बेपत्ताची नोंद
मिळालेल्या माहितीनुसार, नंदकिशोर कल्लु निर्मल (वय ५८, रा. चकाला, अंधेरी, मुंबई) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता होते. या संदर्भात नाशिकरोड पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रारही दोन महिन्यांपूर्वी दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आता थेट देवळाली कॅम्प परिसरातील बना नाल्यात त्यांचा मृतदेह आढळून आल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
तपासाची चक्रे फिरली; पोलिसांसमोर आव्हानांचे डोंगर
शवविच्छेदनानंतरच गूढ उकलणार: मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृत्यूचे नेमके कारण तूर्तास समजू शकलेले नाही. पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.
मुलाला पाचारण: या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृत निर्मल यांच्या मुंबईत राहणाऱ्या मुलाशी संपर्क साधला असून त्याला तातडीने नाशिकमध्ये बोलावून घेतले आहे.
घातपाताची शक्यता? मुंबईतील व्यक्ती नाशिकमध्ये कशी आली? आणि त्यांचा मृतदेह नाल्यात कसा पोहोचला? या प्रश्नांमुळे पोलिसांकडून घातपाताच्या अँगलनेही तपास केला जात आहे.
मृत्यूचे नेमके कारण समोर आल्यानंतरच या संपूर्ण प्रकरणावरील गूढ पडदा दूर होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शाम कोटमे करत आहेत.