कार्बन नाका परिसरात रस्ता खचून १५ फूट खोल खड्डा; वाहतूक ठप्प
कार्बन नाका परिसरात रस्ता खचून १५ फूट खोल खड्डा; वाहतूक ठप्प
img
दैनिक भ्रमर

सातपूर -येथील कार्बन नाका परिसरात शनिवारी (दि. ४) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अचानक रस्ता खचून तब्बल १० ते १५ फूट खोल खड्डा पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
     
कार्बननाका वर्दळीचा  परिसर  असल्याने या रस्त्यावर दररोज हजारो वाहनांची येजा सुरू असते.काही दिवसांपूर्वी या रस्त्यावर भुयारी गटार आणि पाणीपुरवठा योजनेसाठी खोदकाम करण्यात आले होते. मुसळधार पावसामुळे रस्त्याखालची माती वाहून गेल्याने रस्त्याला पोकळी निर्माण झाली आणि अखेर शनिवारी सकाळी अचानक मोठा भाग खचल्या

रस्ता खचताच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही वाहने खड्ड्याच्या अगदी कडेला अडकली; मात्र वाहनचालकांनी प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर तातडीने वाहतूक बंद करण्यात आली. कार्बन नाका हा सातपूरमधील अत्यंत वर्दळीचा मार्ग असल्याने काही वेळातच दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच सातपूर अग्निशमन केंद्राचे प्रभारी केंद्र अधिकारी एस. आर. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लीडिंग फायरमन तारा सूर्यवंशी, वाहन चालक विक्रम उन्हाळे, फायरमन राजेश चौधरी, तसेच ट्रेनी फायरमन शुभम लाड आणि गौरव जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने खड्ड्याभोवती बॅरिकेड्स उभारून संपूर्ण परिसर सुरक्षित केला तसेच नागरिकांना धोकादायक भागापासून दूर ठेवण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली.

घटनेनंतर प्रभाग सभापती समाधान देवरे तसेच नगरसेवक अमोल पाटील आणि दिनकर पाटील व सामाजिक कार्यकर्ते देवा जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून रस्त्याच्या दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची योग्य तपासणी व देखभाल करण्यात आली असती, तर अशी दुर्घटना घडली नसती, असा संताप स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group