गंगापूर धरणात बुडून चौघांचा दुर्दैवी मृत्यू
गंगापूर धरणात बुडून चौघांचा दुर्दैवी मृत्यू
img
चंद्रशेखर गोसावी
नाशिक - मौजे सावरगाव येथे गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात आज दुपारी सुमारे चार वाजून दहा मिनिटांनी अत्यंत दुर्दैवी घटना घडली.

फिरण्यासाठी गेलेले चार जण पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. जिल्ह्यामध्ये सातत्याने धरणपरिक्षेत्रामध्ये अशा स्वरूपाच्या घटना घडत आहेत. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे.

पंधरा दिवसापूर्वी नाशिक शहरातील मखमलाबाद परिसरात राहणाऱ्या विवाहित जोडप्यासह शेजारील दोन मुलं फिरायला गेलेली होती, ती देखील गंगापूर धरणात बुडाल्याची घटना ताजी असतानाच मागील आठवड्यामध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये देखील अशीच घटना घडली होती.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हे चौघे जण दुपारच्या सुमारास धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. गणेश सुरेश गोतरणे (वय १६ वर्षे, रा. सावरगाव), साहिल मनोहर गोतरणे (वय १६ वर्षे, रा. सावरगाव), निखिल मच्छिंद्र गोतरणे (वय १६ वर्षे, रा. सावरगाव) आणि मयुरी पवन जाधव (वय २१ वर्षे, रा. तळेगाव अंजनेरी) या चौघांचा मृत्यू झाला.

आधी तिघे मुलं पाण्यात पोहण्यासाठी गेले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते तिघंही बुडू लागले. ही पाहून त्यांना वाचवण्यासाठी मयुरी जाधव पाण्यात उतरली मात्र, ती पण त्यांच्या सोबत पाण्यात बुडाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने शोधकार्य सुरू करण्यात आले आणि चारही जणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते.

या दुर्घटनेमुळे सावरगाव व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group