नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील 6 खासदारांनी साथ सोडल्यानंतर पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे आज सकाळी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर शिवसैनिकांनी जल्लोषात स्वागत केले. ढोल-ताशांचा गजर, घोषणाबाजी आणि फुलांच्या वर्षावात झालेल्या या स्वागताने परिसर शिवसेनामय झाला होता.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदारांमध्ये मोठी फूट पडल्याची चर्चा सुरू असताना ’ऑपरेशन टायगर’ अंतर्गत ठाकरे गटातील नऊ खासदारांपैकी सहा खासदारांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेशी आपली एकनिष्ठता कायम ठेवली. त्यामुळे त्यांच्या भूमिकेचे शिवसैनिक आणि नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील राजकीय घडामोडींमध्ये व्यस्त असलेले खा. राजाभाऊ वाजे राजधानी एक्स्प्रेसने नाशिकरोडमध्ये दाखल होताच शिवसैनिकांनी घोषणांनी रेल्वे स्थानक परिसर दणाणून सोडला. राजाभाऊ वाजे आगे बढो, हम तुम्हारे साथ है, उद्धव ठाकरे जिंदाबाद आणि शिवसेनेचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार भास्कर भगरे, शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, प्रथमेश गिते, शिवसेना गटनेते केशव पोरजे,भारती ताजनपुरे, योगेश गाडेकर, वैशाली दाणी, मंगल आढाव, शैलेश ढगे, प्रमिला मैंद, योगेश भोर, संजीवनी हंडोरे,रुचिरा साळवे,माजी नगरसेवक संतोष साळवे, निवृत्ती जाधव, योगिता गायकवाड, विकास गिते, भैय्या मणियार, किरण डहाळे, चंदू महानुभाव, राजू मोरे, योगेश देशमुख, अनिल गायखे, अश्विन पवार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष म्हणजे, शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर खा. राजाभाऊ वाजे यांचे झालेले हे भव्य स्वागत पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.