नाशिकमध्ये 'ऑपरेशन क्लीन': शहर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत १६ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, राजस्थानचे तस्कर गजाआड
नाशिकमध्ये 'ऑपरेशन क्लीन': शहर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत १६ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, राजस्थानचे तस्कर गजाआड
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):-  शहरातील वाढत्या ड्रग्ज पुरवठ्याविरोधात नाशिक शहर पोलिसांनी 'अॅक्शन मोड'वर येत गुरुवारी रात्री एकाच वेळी दोन मोठ्या कारवाया करत 'ड्रग्ज माफियांचे' कंबरडे मोडले आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथक, गुंडाविरोधी पथक आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने नाशिकरोड भागात वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून तब्बल १६ लाख ४ हजार २५० रुपये किमतीचे 'एमडी' (मेफेड्रॉन) ड्रग्ज जप्त केले आहे. याप्रकरणी जोधपूर (राजस्थान) कनेक्शन उघड झाले असून पोलिसांनी तीन तस्करांना रंगेहात अटक केली आहे, तर दोन जण फरार आहेत. गॅस दुरुस्तीच्या बहाण्याने शहरात ड्रग्जची विक्री करणाऱ्या या टोळीच्या मुसक्या आवळल्याने गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अंमलदार गणेश वडजे यांना एका स्प्लेंडर मोटारसायकलवरून (MH 15 BB 6647) एमडी ड्रग्जची विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडविरोधी पथक आणि उपनगर पोलिसांनी संयुक्तपणे स्वानंद महिला सांस्कृतिक मंडळाच्या हॉलसमोर सापळा रचला. गुरुवारी रात्री पावणे आठच्या सुमारास संशयित दुचाकीवरून आले असता, दबा धरून बसलेल्या पोलिसांनी झडप घालून दोघांना ताब्यात घेतले.

फॉरेन्सिक टीमच्या उपस्थितीत त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे १० लाख २ हजार ५०० रुपयांचे एमडी ड्रग्ज सापडले. अटक केलेले आरोपींमध्ये श्रवणकुमार लाखाराम बिष्णोई (वय २९) आणि पुनाराम हिराराम बिष्णोई (वय ३२, दोघे रा. जोधपूर, राजस्थान. सध्या रा. प्रेमसागर स्वीट्सजवळ, नाशिकरोड) यांचा समावेश आहे. श्रवणकुमारकडून ६,०७,५०० रुपयांचे तर पुनारामकडून ३,९५,००० रुपयांचे ड्रग्ज, विवो मोबाईल, वजन काटा आणि ७०,१०० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.

या पहिल्या कारवाईनंतर काही तासांतच, उपनगर पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांना सद्गुरू नगर भागातील एका रो-हाऊसमध्ये ड्रग्जचा साठा असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पोलिसांनी रात्री ११:३० वाजता शिवम रो-हाऊसच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटवर छापा टाकला. येथे पोलिसांनी संशयित सुरेश गोदारा याला ताब्यात घेऊन घराची झडती घेतली.

हॉलमधील गादीच्या कोपऱ्यात ठेवलेल्या काळ्या बॅगेत ६ लाख १ हजार ७५० रुपये किमतीचे १२०.३५ ग्रॅम एमडी ड्रग्ज, ८२ रिकाम्या झिपर प्लास्टिक पिशव्या आणि इलेक्ट्रॉनिक वजन काटा आढळून आला. मोबाईल फॉरेन्सिक टीमच्या केमिकल अनालायझर श्रीमती पी. आर. पवार व सायंटिफिक असिस्टंट व्ही. जे. कौटकर यांनी जागेवरच चाचणी करून हे ड्रग्ज 'एमडी' असल्याचे स्पष्ट केले. याप्रकरणी सुरेश पुनवाराम गोदारा (वय २७, रा. शिवम रो-हाऊस, नाशिकरोड) याला अटक करण्यात आली असून पुनाराम इसरवाल (३०, रा. राजस्थान) आणि श्रवण माचरा (रा. जोधपूर, राजस्थान) हे फरार आहेत. 

या दोन्ही कारवायांप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस हवालदार गजेंद्र बरेलीकर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. राजस्थानमधील मोठ्या माफियांपर्यंत पोहोचले असून, या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण? नाशिकमध्ये हे ड्रग्ज कुणाला पुरवले जाणार होते? याचा पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील आणि उपनगरचे उपनिरीक्षक सपकाळे करत आहेत.

या 'सुपरकॉप्स'नी बजावली कामगिरी 

पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके,अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक संदीप चौधरी, ताजणे, हवालदार बळवंत कोल्हे, मिलिंद बागुल, गौरव गवळी, सौंदाणे, योगेश सानप, बाळासाहेब नांद्रे, अर्चना भड, गुंडा विरोधी पथकाचे उपनिरीक्षक संदीप पवार, हवालदार ठाकरे, भागवत, गांगुर्डे, जाधव यांनी ही धडक कारवाई करून नाशिककरांना मोठा दिलासा दिला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group