किरकोळ वादातून भरदिवसा गळा चिरला; २ तास रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमीचा 'त्या' दोघांनी वाचवला जीव
किरकोळ वादातून भरदिवसा गळा चिरला; २ तास रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमीचा 'त्या' दोघांनी वाचवला जीव
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर किरकोळ वादातून एका ४५ वर्षीय व्यक्तीच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करून त्याची निर्घृण हत्येचा प्रयत्न करण्यात आला. गोकुळ सुखदेव लोंढे (वय ४५, रा. म्हसरूळ) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास नाशिकरोड येथील एका शॉपिंग कॉम्प्लेक्सलगत असलेल्या चहाच्या टपरीजवळ तीन जण जेवण करून बसले होते. गप्पा मारता मारता अचानक त्यांच्यात कोणत्यातरी कारणावरून खटका उडाला. वाद इतका टोकाला गेला की, दोघा संशयितांनी गोकुळ लोंढे यांच्यावर मागून अचानक धारदार शस्त्राने हल्ला चढवला. थेट गळ्यावरच जोरदार वार केल्यामुळे लोंढे जागेवरच कोसळले.

रक्ताचा सडा पडताच दोन्ही हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पोबारा केला. धक्कादायक बाब म्हणजे, भरचौकात गोकुळ लोंढे हे तब्बल दोन तास रक्ताच्या थारोळ्यात गंभीर अवस्थेत तडफडत पडले होते. शेकडो लोक तिथून जात होते, मात्र उपस्थित बघ्यांपैकी एकालाही त्यांना रुग्णालयात नेण्याची माणुसकी सुचली नाही. केवळ मोबाईलवर व्हिडिओ काढण्यात आणि बघ्याची भूमिका घेण्यातच लोक गुंग होते.

पोलीस विशाल पाटील, अरुण गाडेकर धावले देवदूतासारखे!

दोन तासांनंतर या घटनेची माहिती मिळताच विशाल पाटील आणि अरुण गाडेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कोणतीही भीती न बाळगता गंभीर जखमी लोंढे यांना तात्काळ उचलून रुग्णालयात दाखल केले. पाटील आणि गाडेकर यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाल्यामुळे लोंढे यांचे प्राण वाचले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

नाशिकरोड पोलिसांकडून तपास सुरू

दिवसाढवळ्या झालेल्या या खुनी हल्ल्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरून फरार झालेल्या दोन्ही संशयितांचा पोलीस कसून शोध घेत आहेत. या हल्ल्यामागचे नेमके कारण काय होते? जुना वाद की ऐनवेळचा राग? याचा तपास सुरू आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथके संशयितांच्या मागावर आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group