बिटको रुग्णालयातून रुग्ण महिलेचा मोबाईल चोरी; अल्पवयीन मुलीला अश्लील मेसेज पाठवणाऱ्याला नागरिकांचा चोप
बिटको रुग्णालयातून रुग्ण महिलेचा मोबाईल चोरी; अल्पवयीन मुलीला अश्लील मेसेज पाठवणाऱ्याला नागरिकांचा चोप
img
Chandrakant Barve



नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी)  येथील बिटको रुग्णालयातून एका महिला रुग्णाचा मोबाईल चोरून त्यावरून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला मध्यरात्री अश्लील मेसेज पाठवून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

संतप्त नागरिकांनी पाठलाग करून संशयिताला पकडत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मोहम्मद मोहिद्दीन सय्यद (वय २१, रा. गाडगे महाराज पुतळ्याजवळ, विहितगाव, नाशिकरोड) याला अटक केली आहे. पीडित मुलीच्या ४७ वर्षीय रिक्षाचालक वडिलांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवळाली कॅम्प परिसरात राहणाऱ्या १३ वर्षीय मुलीच्या मोबाईलवर १९ मे रोजी पहाटे ४:१७ वाजेच्या सुमारास ज्योती जाधव नावाच्या महिलेच्या मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सॲप मेसेज येण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला इंग्रजीतून संवाद साधल्यानंतर समोरून अश्लील स्वरूपाचे मेसेज पाठवण्यात आले. घरातील सर्वजण झोपेत असल्याने घाबरलेल्या मुलीने तात्काळ ज्योती जाधव यांच्या भावाला संपर्क साधून माहिती दिली.

यानंतर संबंधित नातेवाईक बिटको रुग्णालयात पोहोचले. तेथे ज्योती जाधव या गेल्या आठ दिवसांपासून उपचार घेत असल्याचे समोर आले. चौकशीदरम्यान पहाटे ३:३० ते ३:४५ वाजेच्या सुमारास त्यांचा मोबाईल चोरीला गेल्याचे उघड झाले. तसेच बाजूच्या बेडवरील दुसऱ्या एका महिलेच्या मोबाईलवरूनही त्याच प्रकारचे अश्लील मेसेज पाठवण्यात आल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान, मुलीच्या नातेवाईकांनी व मित्रांनी आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला. त्यांनी आरोपीसोबत चॅटिंग सुरू ठेवून त्याला बोलण्यात गुंतवले. चॅटिंगच्या आधारे माग काढत असताना संशयित मोहम्मद सय्यद हा आंबेडकरनगर येथील सम्राट ग्रुपच्या सिग्नलजवळ आढळून आला. त्याला पकडताच परिसरात मोठी गर्दी झाली आणि संतप्त नागरिकांनी आरोपीला रस्त्यावरच लाथाबुक्यांनी चांगलाच चोप देत मारहाण केली.

यानंतर आरोपीला नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसी चौकशीत त्याने मोबाईल चोरी करून अश्लील मेसेज पाठवल्याची कबुली दिल्याचे समोर आले. तो व्यसनाधीन असल्याचीही चर्चा परिसरात आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायदा कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक माळी पुढील तपास करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group