९ मे २०२६
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी)- मनात जिद्द असेल तर हवे ते करण्यात यश येत असते. त्या यशाच्या मागे कष्टही तितकेच असतात. असेच काहीसे उदाहरण देता येईल ते म्हणजे सोहम सोनवणे याचे. दहावीचा निकाल नुकताच लागला, अनेकांना ९०-९५ टक्के मार्क मिळाले. त्यात सोहमही मागे राहिला नाही. सोहमलाही दहावी परीक्षेत भरभरून यश मिळाले. सर्वांना यश मिळाले असले तरी सोहमचे यश हे थोडे वेगळ्या प्रकारचे आहे. सोहम हा ७८% दिव्यांग असतांनाही त्याने जिद्द सोडली नाही व त्याच्या कुटुंबीयांनी त्याला दिलेली साथ ही महत्वपूर्ण ठरली.
सोहम दहावीत गेल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना त्याच्याविषयी चिंता होती, मात्र परमेश्वर आपल्यासोबत असल्यावर चिंता कशाची करायची? असेच सोहमने दाखवून दिले. दहावीत गेल्यानंतर सोहम किमान पास तरी व्हावा, यासाठी त्याच्या कुटुंबियांनी वर्षभर मेहनत घेतली. सोहमला शाळेत न पाठवता घरीच त्याच्याकडून अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्यात आला. परीक्षा देत असताना किमान रायटर तरी सोहमला मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र तेही न मिळाल्याने सोहमचे कुटुंबीय नाराज झाले. परंतु जिद्द सोडली नाही. सकाळ-सायंकाळ अभ्यास करत ध्येय डोळ्यासमोर ठेवले. जन्मताच दिव्यांग असतांनाही सोहमने एखादा नॉर्मल मुलाप्रमाणे परीक्षा दिली आणि यशाला गवसणी घातली.
सोहमला नवजीवन डे स्कूलचे सुभाष देशमुख, प्रिन्सिपल डिंपल पाटील, शेवाळे सर, अहिरे सर यांचेही मार्गदर्शन लाभले. विशेष करून सोहमला आचार्य क्लासचे सचिन माळवे सर यांचे महत्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच सोहमला यश मिळाले असेही म्हणता येईल. सोहम हा दैनिक भ्रमरच्या माधुरी चव्हाण-सोनवणे यांचा मुलगा आहे. सोहम हा अभ्यासात हुशार असतानाच चित्रकलेतही उत्कृष्ट कलाकार आहे.
आतापर्यंत भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, सुभाषचंद्र बोस, डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासह नाशिकचे सुभाष देशमुख, दैनिक भ्रमरचे संपादक चंदुलाल शाह यांसारख्या अनेक महत्वपूर्ण व्यक्तींच्या चित्रांची पेंटिंग हुबेहुब सोहमने साकारली आहे. सोहम हा चित्रकलेची एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट परीक्षा उत्तम ग्रेडमध्ये पास आहे. एकंदरच विचार केला तर परमेश्वराने सोहमला दिव्यांगत्व दिले असले तरी दुसर्या बाजूने सोहमला भरभरून गुणवत्ताही दिली. त्यामुळेच सोहमच्या यशाला सलाम केल्याशिवाय राहवत नाही.
Copyright ©2026 Bhramar