नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी):- धावत्या कुशीनगर एक्सप्रेसमध्ये एका गोंडस कन्येचा जन्म झाल्याची आनंददायी आणि तितकीच हृदयस्पर्शी घटना घडली.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मुख्य तिकीट निरीक्षक आर. एस. तेली यांच्या तत्परता, संवेदनशीलता आणि कर्तव्यदक्षतेमुळे गर्भवती महिलेची रेल्वेतच सुरक्षित प्रसूती होऊन आई व बालिकेचे प्राण वाचले.
मुंबई एलटीटी-भुसावळ दरम्यान धावणाऱ्या कुशीनगर एक्सप्रेसमध्ये आर. एस. तेली कर्तव्यावर होते. कल्याण स्थानक पार झाल्यानंतर ए-१ कोचलगतच्या जनरल डब्यातील एका प्रवाशाने त्यांना माहिती दिली की, एका गर्भवती महिलेला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या असून डब्यात मोठी गर्दी आहे. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच तेली यांनी तत्काळ पुढाकार घेतला.
कसारा स्थानक आल्यानंतर प्रवाशांच्या मदतीने संबंधित महिलेला सुरक्षितपणे कोचच्या कॅरी डोअर परिसरात आणण्यात आले. त्याच डब्यात प्रवास करणाऱ्या डॉ. पूजा खरगे यांनी तातडीने वैद्यकीय मदत करत रेल्वेतच महिलेची सुरक्षित आणि नैसर्गिक प्रसूती केली. या धावत्या कुशीनगर एक्सप्रेसमध्ये महिलेने एका सुंदर कन्येला जन्म दिला आणि डब्यातील प्रवाशांनीही सुटकेचा नि आनंदाचा श्वास घेतला.
घटनेची माहिती तत्काळ मुख्य वाणिज्य नियंत्रकांना देण्यात आली. त्यानंतर इगतपुरी स्थानकावर रुग्णवाहिका, स्ट्रेचर, डॉक्टर आणि अन्य आवश्यक वैद्यकीय व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली. रेल्वे इगतपुरी स्थानकात पोहोचताच महिला व नवजात बालिकेला रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
मुख्य तिकीट निरीक्षक आर. एस. तेली यांच्या कर्तव्यनिष्ठा, तत्परता आणि मानवी सेवाभावाचे प्रवासी तसेच रेल्वे प्रशासनाकडून कौतुक करण्यात येत आहे. भारतीय रेल्वेच्या “प्रवासी सेवा आणि सुरक्षा” या बांधिलकीचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.