नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील खुलास्यांची मालीका थांबता थांबेना. नविन दिवस नविन खुलासा रोज नवी माहिती समोर येत आहे. खरात रोज एका नविन आडचणीत सापडत आहे. शिर्डी येथील बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या जमीन खरेदी-विक्री व्यवहाराप्रकरणी भोंदू अशोक खरात याची कसून चौकशी सुरू आहे. गेल्या पाच दिवसांपासून तपास यंत्रणांनी खरातवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि दस्तऐवजांची अत्यंत बारकाईने छाननी केली जात आहे. शनिवारी खरातची पोलीस कोठडी संपत असल्याने पोलिसांकडून तपासाचा वेग वाढवण्यात आला असून, या चौकशीदरम्यान शुक्रवारी मोठे नाट्य पाहायला मिळालं.
भोंदू खरात आणि साक्षीदार समोरासमोर
चौकशी या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी शुक्रवारी जमीन व्यवहाराशी संबंधित महत्त्वाचे साक्षीदार आणि मूळ मालकांना अशोक खरातसमोर बसवून चौकशी केली. यामध्ये साक्षीदार सचिन वाणी, प्रभाकर गुंजाळ, भाऊसाहेब चौधरी आणि जमीन मालक रावसाहेब गोंदकर यांचा समावेश होता. पोलिसांनी जेव्हा या सर्वांना समोरासमोर बसवून व्यवहाराबाबत विचारपूस सुरू केली, तेव्हा वातावरण कमालीचं तापलं होतं.
खरात संतापला म्हणाला 'तुमच्यामुळेच मी अडकलो'
चौकशी सुरू असताना भोंदू अशोक खरात आपला संयम हरवून बसला. त्याने स्वतःचा गुन्हा मान्य करण्याऐवजी उलट साक्षीदारांवरच संताप व्यक्त केला. "तुमच्यामुळेच मी या वादात आणि पोलीस चौकशीत अडकलो आहे," असा सूर लावत त्याने सर्व खापर साक्षीदारांवर फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, खरातचा हा पवित्रा त्याच्यावरच उलटला.
साक्षीदारांनी खरातला चांगलंच झापलं
खरातच्या संतापानंतर साक्षीदार देखील कमालीचे आक्रमक झाले. त्यांनी पोलिसांसमोरच खरातला धारेवर धरले. "या जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची मागणी आम्ही खूप आधीच केली होती, मात्र तेव्हा तुम्ही ऐकले नाही. उलट, तुम्ही त्या काळात बड्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे सांगून आमची तोंडे बंद केली होती आणि आम्हाला धमकावले होते. आता प्रकरण अंगलट आल्यावर आणि पोलीस कारवाई सुरू झाल्यावर आम्हाला जबाबदार का धरता?" असा थेट सवाल साक्षीदारांनी विचारला. या खुलाशामुळे खरातने या व्यवहारात मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर केल्याचे स्पष्ट झाले असून, यामुळे तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.
आर्थिक व्यवहारांची छाननी सुरू
पोलीस तपास यंत्रणांनी आतापर्यंत या व्यवहारातील पैशांच्या देवाणघेवाणीवर लक्ष केंद्रित केले आहे. जमिनीच्या व्यवहारासाठी पैसे कोठून आले, कुणाला किती दिले गेले आणि यामध्ये आणखी किती लोकांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत. खरातची पोलीस कोठडी उद्या संपत असल्याने पोलीस त्याला पुन्हा न्यायालयात हजर करतील. पोलीस आणखी कोठडीची मागणी करतात की त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.