राज्यातील घडामोडींना वेग आला असून आता नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. कांद्याच्या घसरत्या दरांबाबत राज्यभरातील शेतकरीं आक्रमक झाले असून आता नाशिकमध्ये ‘क्रांती महामोर्चा’ काढण्यात आला आहे. महाविकास आघाडी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या ‘क्रांती महामोर्चा’ला मोठा प्रतिसाद मिळाला.
नाशिकमध्ये कांद्याच्या घसरत्या दरांविरोधात शेतकऱ्यांचा संताप तीव्र झाला आहे. या मोर्चादरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखून आंदोलन केल्यामुळे चांदवड परिसरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.
या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झालेत. आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अनेक नेत्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलनात सहभाग घेतला आहे.
यावेळी बोलताना आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. “या मोर्चाचं नेतृत्व सामान्य शेतकरी करत आहेत, आम्ही फक्त त्यांच्या पाठीशी उभे आहोत. सरकारने कांद्याला 24 रुपये भाव देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र आता 12 रुपयांचा दर दिला जातोय. मोर्चानंतर सरकारवर दबाव आल्याने दरात थोडी वाढ झाली, पण त्याचा शेतकऱ्यांना काहीच फायदा नाही,” असा आरोप त्यांनी केला.
रोहित पवार यांनी नाफेडवरही निशाणा साधत, “नाफेडकडून फक्त 2 लाख टन कांदा खरेदी होणार आहे. शेतातून बाजारापर्यंत कांदा आणण्यासाठीच लाखो रुपयांचा खर्च होतो. पुढील काही वर्षे शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा मोठा प्रश्न आहे,” असं म्हटलं. तसेच, “आज सरकारमध्ये फक्त MLC जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे कोणी लक्ष देत नाही,” अशी टीकाही त्यांनी केली.