पनीर, औषधांनंतर अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने आपला मोर्चा आता सौंदर्यप्रसाधनांवकडे वळवला आहे . बेकायदेशीर आणि बनावट औषध विक्रेत्यांवर कडक कारवाई केल्यानंतर, आता अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने आपला मोर्चा आता सौंदर्यप्रसाधनांकडे वळवला आहे. एफडीएने राज्यभरात राबवलेल्या विशेष मोहिमेत दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या आणि विनापरवाना ब्युटी प्रोडक्ट्सची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर छापे टाकले आहेत. या राज्यव्यापी कारवाईत एकूण ३४ लाख ६१ हजार रुपयांची सौंदर्यप्रसाधने जप्त करण्यात आली आहेत.
साताऱ्यातील कराडमध्ये दिशाभूल करणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांचा तब्बल २९.४५ लाख रुपयांचा साठा प्रशासनाने जप्त केला आहे. तपासणीत अनेक नामांकित उत्पादनांवर बॅच क्रमांक, उत्पादन दिनांक आणि उत्पादकाची कोणतीही माहिती नसल्याचे किंवा अपुरी असल्याचे समोर आले. काही उत्पादनांवर परवाना क्रमांक होता, पण उत्पादकाचे नावच गायब असल्याने ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे.
दुसरीकडे, मुंबईतील प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केट परिसरात ‘ब्रेस्ट एन्लार्ज’, ‘बट एन्हान्समेंट’ आणि ‘फॅट बर्नर’सारखे भ्रामक आणि जादुई दावे करणाऱ्या उत्पादनांवर छापा टाकून १.२० लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. तर कांदिवली पश्चिम येथील एका संस्थेवर टाकलेल्या छाप्यात धक्कादायक बाब उघड झाली. येथे कोणत्याही आवश्यक परवान्याशिवाय सौंदर्यप्रसाधने आणि औषधांचे उत्पादन सर्रास सुरू होते. एफडीएने येथून विनापरवाना ब्युटी प्रोडक्ट्स, कच्चा माल आणि यंत्रसामग्रीसह ३.९६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या सर्व कंपन्या आणि संबंधित व्यक्तींवर औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम १९४० (Drugs and Cosmetics Act) अंतर्गत गुन्हे नोंदवून कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. ग्राहकांनी आकर्षक जाहिरातींना न भुलता अधिकृत उत्पादनेच खरेदी करावीत, असे आवाहन एफडीएने केले आहे.