पुण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या धडक कारवाईमुळे राज्यातील विषारी दारूच्या अवैध नेटवर्कला मोठा हादरा बसला आहे.तब्बल १५ लाख लिटर विषारी दारुची निर्मीती करण्याचा कट उधळवून लावण्यात आल्याने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कुरकुंभ येथे टाकलेल्या छाप्यात विषारी दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे मोठ्या प्रमाणातील रसायनांचा साठा जप्त करण्यात आला असून, या कारवाईची राज्यभर चर्चा सुरू आहे.
विषारी दारु निर्मितीसाठी वापरले जाणारे हजारो लिटरचे केमिकल जप्त करण्यात आले. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या धडक कारवाईची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. ३४२० किलो कोरल हायड्रेट आणि ते करण्यासाठी लागणारे ५८००लिटर रॉ- केमिकल जप्त करण्यात आले. पुण्यातील कुरकुंभ येथे ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ येथील एका कारखान्यातून ३४२० किलो वजनाचा पिवळया रंगाचा स्फटीक सदृश्य पदार्थ तसेच ते तयार करण्याकरीता लागणारे ५८०० लिटर रॉ केमिकल मिळून आले होते. किशोर दत्तात्रय सुर्वे, शैलेश विठल ठाकुर, नबी सरवर जमीर सिध्दीकी, आदेश विठठल पाचांगणे हे अवैध फॅक्ट्री चालवित असल्याचे तपासातून आढळून आलेले आहे. संबंधित कारखाना सुर्वेच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाले असून तिथे मिळून आलेले केमिकल हे शैलेश ठाकूर यानेच बनविले असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या कारवाईमध्ये एकूण ३४२० किलो वजनाचा फिकट पिवळ्या पांढऱ्या रंगाचे स्फटीकासारखा संशयीत पदार्थ तसेच ते तयार करण्याकरीता लागणारे ५८०० लिटर रॉ केमिकल मिळून आले आहे. या ठिकाणी मेफेड्रॉन या अंमली पदार्थाचे उत्पादन करण्याकरीता आवश्यक असलेले सेट्रीफ्युगल मशीन तसेच GLR मशीन मिळून आलेले आहेत.
संशयित पदार्थाची न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा पुणेतर्फे तपासणी करून घेण्यात आली असून त्यांचकडून प्राप्त अहवालानुसार या संशयीत पदार्थामध्ये प्रतिबंधीत करण्यात आलेले कोरल हायड्रेट हे केमिकल असल्याचे आढळून आलेले आहे. या कोरल हायड्रेट पासून विषारी दारुची निर्मीती केली जाते. ३४२० किलो रसायनापासून सुमारे १५ लाख लिटर विषारी दारुची निर्मीती केली जाऊ शकते. या ठिकाणी जप्त करण्यात आलेले सेट्रीफ्युगल मशीन तसेच GLR मशीन यांची किंमत अंदाजे १ कोटी आहे.