ऐन सणासुदीत LPG सिलिंडरच्या किमती वाढल्या असल्याच वृत्त आहे. आज म्हणजे १ ऑक्टोबरपासून व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी १९ किलोच्या कमर्शियल सिलिंडरच्या किमतीत शहरानुसार वाढ केली आहे. मात्र, १४.२ किलोच्या घरगुती LPG सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
मुंबईसह दिल्लीतही सिलिंडर महागला मुंबईत कमर्शियल LPG सिलिंडरच्या दरात ६३ रुपयांची वाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये २,७०१ रुपये असलेला सिलिंडर आता २,७६७ रुपये झाला आहे. मात्र, मुंबईतील घरगुती LPG सिलिंडरचा दर ९४१.५० रुपये इतकाच आहे. चेन्नईमध्ये कमर्शियल सिलिंडरची किंमत २,९६१.५० रुपयांवरून वाढून २,९८३ रुपये झाली आहे. तसेच घरगुती सिलिंडरचा दर ९५७.५० रुपये इतका आहे. अहमदाबादमध्ये १९ किलोचा कमर्शियल सिलिंडर आता २,८३१.५० रुपये, तर घरगुती सिलिंडर ९४९ रुपये आहे. कन्याकुमारीमध्ये कमर्शियल सिलिंडरचा दर वाढून ३,०४६ रुपये झाला आहे. येथे घरगुती सिलिंडरची किंमत १,०२६ रुपये आहे. राजधानी दिल्लीमध्ये १९ किलोचा कमर्शियल सिलिंडर सप्टेंबरमध्ये २,७४७.५० रुपयांना मिळत होता. आता त्याच्या दरात ६२.५० रुपयांची वाढ झाली असून, आजचा दर २,८१० रुपये झाला आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि व्यावसायिक आस्थापनांवर या वाढीचा थेट परिणाम होणार आहे.
लेहमध्ये सिलिंडरचे सर्वाधिक दर कमर्शियल LPG सिलिंडरचा सर्वाधिक दर लेहमध्ये आहे. येथे १९ किलोच्या सिलिंडरची किंमत ३,३८५.५० रुपयांवरून वाढून ३,४५० रुपये झाली आहे. म्हणजेच तब्बल ६४.५० रुपयांची वाढ झाली आहे. लेहमध्ये घरगुती सिलिंडरचा दर ११७९ रुपये आहे. पटणा, लखनऊ आणि भोपाळमध्येही दर वाढ पटणामध्ये कमर्शियल सिलिंडर ७१.५० रुपयांनी महाग झाला आहे. सप्टेंबरमध्ये ३,०२९ रुपये असलेला सिलिंडर आता ३,१००.५० रुपये झाला आहे. भोपाळमध्ये तो २,७५५.५० रुपयांवरून २,८१५ रुपये, तर लखनऊमध्ये २,८७० रुपयांवरून २,९३२.५० रुपये झाला आहे. दरम्यान,१४.२ किलोच्या घरगुती LPG सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे घरगुती ग्राहकांना सध्या दिलासा मिळाला असला तरी व्यावसायिक सिलिंडरच्या दरवाढीमुळे हॉटेल आणि खाद्यपदार्थांच्या व्यवसायांवरील खर्च वाढण्याची शक्यता आहे.