नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- बागलाण तालुक्यातील मौजे नामपूर येथे गणेश विसर्जनासाठी मोसम नदीपात्रात गेलेल्या दोन १७ वर्षीय विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे नामपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यातील गणेशोत्सवाला गालबोट लागले आहे.
सोमवारी गणरायाचे आगमन झाल्यानंतर काल पाच दिवसांच्या गणेशाचे मोठ्या आनंदाने उत्साहाच्या वातावरणात जिल्ह्यात विसर्जन सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे जिल्ह्यातील गणेशोत्सवाला गालबोट लागले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ऋतिक दादाजी वाघ (वय १७, रा. नामपूर चारफाटा, ता. बागलाण, जि. नाशिक) आणि अथर्व दीपक पगार (वय १७, रा. उत्राने, ता. बागलाण, जि. नाशिक) हे दोघे गणेश विसर्जनासाठी मोसम नदीपात्रात गेले होते. यावेळी दोघेही पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी तातडीने शोधमोहीम राबवून दोघांचेही मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढले.