सध्या राजकरणात मोठे राजकीय भूकंप होत असून आता ठाकरेंच्या शिवसेनेत मोठे वादळ निर्माण झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली 'ऑपरेशन टायगर मोहीम' अखेर फत्ते झाली असून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ठाकरेसेनेतील फुटीर गटाच्या शिवसेनेतील विलीनीकरणाला मान्यता दिली असल्याचे समोर आले आहे. यानंतर राजकारणासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ पाहायला मिळत आहे.
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या या निर्णयानंतर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ओमराजे निंबाळकर यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.ओमराजे निंबाळकर हे धाराशिवचे खासदार आहेत. चार वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना फुटल्यानंतरही उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले होते.
ओमराजे निंबाळकर हे २०२४ मधील लोकसभा निवडणूक मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे ९ खासदार निवडून आले होते.शिंदे गटाकडून 'ऑपरेशन टायगर' सुरू झाल्यानंतर ओमराजे निंबाळकर हे ठाकरेंसोबत होते. ओमराजे यांच्या नकारामुळेच 'ऑपरेशन टायगर' लांबणीवर गेल्याची चर्चा होती. मात्र, त्यांच्या होकारानंतर ठाकरेंच्या खासदाराचा एक गट फुटला आहे.
ओमराजे निंबाळकर यांच्या सोशल मीडिया पोस्टवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आम्ही तुमच्याकडून ही अपेक्षा करु शकत नाही, उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहा असे काहींनी म्हटले. तर, आधी खासदारकीचा राजीनामा द्या मग निवडून येऊन दाखवा असे आव्हानही नेटकऱ्यांनी दिले.
काही नेटकऱ्यांनी ओमराजे निंबाळकर यांना ओमदादा निष्ठावंत राहा, गद्दार गँगमध्ये सहभागी होऊ नका असे आर्जव केले. तर, काहींनी गद्दार म्हणत हेटाळणी केली आहे. एका नेटकऱ्याने लोकशाही, राजकारण सोडा लोकांचा चांगुलपणावरचा विश्वासही उडून जाईल असे म्हटले आहे.