सुनेत्रा पवारांच्या खासगी विमानात बिघाड ! मोठा अनर्थ टळला
सुनेत्रा पवारांच्या खासगी विमानात बिघाड ! मोठा अनर्थ टळला
img
Nandini khandare More
मुंबई विमानतळावर ९ जूनच्या संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली. सुनेत्रा पवार यांच्या खाजगी विमानात उड्डाणापूर्वीच तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. विमान दिल्लीकडे रवाना होणार असतानाच हा दोष आढळल्यामुळे तत्काळ उड्डाण थांबवण्यात आले. सुदैवाने, ही बाब वेळेत लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता सुनेत्रा पवार यांचे खाजगी विमान मुंबईहून दिल्लीसाठी उड्डाण करणार होते. मात्र, ऐनवेळी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या निदर्शनास आले. या तांत्रिक बिघाडामुळे विमान तब्बल २ तास मुंबई विमानतळावरच थांबवून ठेवावे लागले. अखेर सर्व तांत्रिक बाबी तपासून आणि आवश्यक ती दुरुस्ती केल्यानंतर, संध्याकाळी ५ चे हे विमान दोन तास उशिराने म्हणजेच रात्री ७ वाजता दिल्लीसाठी रवाना झाले.

विशेष म्हणजे या विमानामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार, खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल हे महायुतीचे दिग्गज नेतेही प्रवास करत होते. सर्व नेते दिल्लीतील एका महत्त्वाच्या राजकीय बैठकीसाठी रवाना होत असताना हा प्रकार घडला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, बिघाड झालेले खाजगी विमान हे 'व्हीएसआर' (VSR) कंपनीचे होते. विमानातील तांत्रिक बिघाड दुरुस्त केल्यानंतर सर्व नेत्यांनी याच 'व्हीएसआर' कंपनीच्या विमानाने आपला पुढील प्रवास सुरक्षितपणे पूर्ण केला. या तांत्रिक बिघाडामुळे विमानाला २ तास उशीर झाला असला, तरी सर्व प्रवासी नेते सुरक्षितपणे दिल्लीला पोहोचल्याने प्रशासनाने आणि कार्यकर्त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group