राज्यात पावसाचा हाहाकार !  पुढील 24 तास धोक्याचे; हवामान खात्याने दिला ''हा'' इशारा
राज्यात पावसाचा हाहाकार ! पुढील 24 तास धोक्याचे; हवामान खात्याने दिला ''हा'' इशारा
img
Nandini khandare More
राज्यात सध्या पावसाने मोठा हाहाकार माजवला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यापासून अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा तडाखा हा सुरूच आहे. गेल्या काही तासांपासून अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. कोकण, घाटमाथा, नाशिक, मुंबईसह विविध जिल्ह्यांत संततधार सुरू आहे.

असे असताना भारतीय हवामान विभागाने राज्यात पुढील 24 तासांत काही जिल्ह्यांमध्ये मुसळाधार पावसाचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे की, उत्तर-पश्चिम बंगालच्या खाडीत आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज, सोमवारी (27 जुलै) राज्यातील अनेक भागांत हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. weather update, maharashtra weather update

राज्यातील नाशिक, सातारा, रायगड, रत्नागिरी आणि घाटमाथा परिसरात अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागांत 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकरी आणि नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुणे आणि सातारा घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असून या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

नाशिकमध्ये पावसाचे थैमान

सततच्या पावसामुळे नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. अनेक धरणांमध्येही पाणीसाठा वेगाने वाढत आहे. मुंबई आणि उपनगरांमध्येही रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. पण, नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे सध्या जायकवाडीत 47,405 क्युसेक (सुमारे 13 लाख 42 हजार 357 लिटर प्रति सेकंद) वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. अवघ्या 4 दिवसांत तब्बल 481.38 दलघमीहून अधिक पाण्याची आवक झाली आहे. 22 जुलै रोजी 31 टक्के असलेला उपयुक्त जलसाठा रविवारी (26 जुलै) रात्री 9 वाजेपर्यंत 53.41 टक्क्यांवर पोहोचला आहे. गतवर्षी याच दिवशी हा साठा 79.25 टक्क्यांवर होता. एल निनोचे सावट आणि मान्सूनच्या उशिराच्या आगमनानंतरही धरण निम्म्याहून अधिक भरल्याने मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्यासह सिंचन आणि उद्योगांचाही पाणीप्रश्न निकाली निघाला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group