सध्या राज्यातील राजकरणात मोठ्या घडामोडी घडत असून ठाकरे गटामध्ये वादळ निर्माण झाले असून शिवसेना गोटात कमालीच्या हालचाली वाढल्या आहेत. ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार हे शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. याचदरम्यान ठाकरे गटाच्या नाशिकच्या एका खासदाराने एक वक्तव्य केलं आहे.
ठाकरे गटाचे फुटीर खासदार दिल्लीत पोहचले असल्याचे सांगण्यात येत आहे. तर, दुसरीकडे ठाकरे गटाकडे लोकसभेच्या ९ पैकी किती खासदार सोबत राहणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाच्या एका खासदारा आपण दिल्लीत पोहचत असल्याचे सांगत पुढचा प्लॅन सांगितला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे काही खासदार आज सकाळी नवी दिल्लीत शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या अत्यंत महत्त्वाच्या आणि गुप्त मानल्या जाणाऱ्या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः उपस्थित राहणार असल्याचे समजते. त्यामुळे ठाकरे गटाचे किती खासदार या बैठकीला हजेरी लावणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मागील काही महिन्यांपासून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार फोडण्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. मात्र, दोन खासदारांच्या नकाराने ऑपरेशन टायगरला ब्रेक लागला होता. अखेर हा अडथळा दूर झाल्याने ठाकरे गटाला खिंडार पाडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
'
शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी एका वृत्तवाहिनीशी फोनवरून संवाद साधला. वाजे यांनी सांगितले की, मी आता राजधानी एक्स्प्रेसमध्ये असून दिल्लीत दाखल होणार आहे. दुपारी ३ वाजता संसदेच्या समितीची बैठक आहे. या बैठकीत आपण सहभागी होण्यासाठी दिल्लीत पोहचत असल्याचे वाजे यांनी सांगितले. ऑपरेशन टायगरबाबत बोलताना राजाभाऊ वाजे यांनी सांगितले की, मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम आहे. मी ज्या पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलो, त्या पक्षाशी फारकत घेणार नसल्याचे राजाभाऊ वाजे यांनी सांगितले.