पुढील 24 तास राज्यासाठी महत्वाचे असून धोक्याचे असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. राज्यात 22 जूनपासून पावसाचं आगमन झालं असून आता राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान आता उद्यापासून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अशीच स्थिती राहणार आहे. हवामान विभागाकडून या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाकडून राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज तर कही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकणात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 14 मिलिमिटर पाऊस पडला आहे. रत्नागिरी तालुक्यात सर्वात जास्त 49 मिलिमिटर पाऊस झाला आहे. दरम्यान आज हवामान विभागाकडून कोकणातील सर्वच जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या नव्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टीवरील भागांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यात आहे. दरम्यान या काळात किनारपट्टी भागात ताशी 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हे एक नवं संकट राज्यावर येणार आहे. आजपासून पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. यावर्षी जून महिन्यात कोकणात सरासरीच्या तब्बल 81 टक्के कमी पाऊस झाला आहे, मात्र पुढील काही दिवसांमध्ये पावसाचा हा तुटवडा भरून येऊ शकतो, असा अंदाज हवामा विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाकडून राज्यातील तब्बल 24 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून त्यामध्ये बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, ठाणे, नाशिक, रायगड, मुंबई, तसेच विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांचा समावेश आहे. यंदा देशासह महाराष्ट्रात मान्सूनवर अल् निनोचं संकट आहे. त्यामुळे पावसाचं प्रमाण कमीच राहण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यात तर पावसाचं प्रमाण आणखी कमी होईल, परंतु पुढील दहा तारखेपर्यंत राज्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.