दोन वर्षांपासून आईचे डायलिसिस, घराची जबाबदारी अन् जिद्दीचा 'विशाल' विजय!
दोन वर्षांपासून आईचे डायलिसिस, घराची जबाबदारी अन् जिद्दीचा 'विशाल' विजय!
img
दैनिक भ्रमर






नाशिक : परिस्थितीने लादलेले संकट माणसाला एकतर संपवते किंवा अधिक कणखर बनवते. मखमलाबाद येथील विशाल ठाकरे या विद्यार्थ्याने संकटावर पाय देऊन यशाचे शिखर गाठले आहे. आईचा किडनीचा गंभीर आजार, घरात सुरू असलेले आईचे दिवसाआड डायलिसिस आणि आर्थिक ओढाताण... अशा विदारक स्थितीतही विशालने दहावीच्या परीक्षेत केवळ यशच मिळवले नाही, तर आपल्या शाळेत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.



विशालचे कुटुंब सध्या एका कठीण टप्प्यातून जात आहे. आईला गेल्या दोन वर्षांपासून किडनीच्या आजाराने ग्रासले आहे. घरात मुलगी नसल्याने आजारी आईची सुश्रूषा करणे, घरातील कामे आणि जबाबदाऱ्या पार पाडणे हे सर्व विशाललाच करावे लागते. हॉस्पिटलच्या वाऱ्या आणि आईची सेवा करून उरलेल्या वेळात त्याने अत्यंत एकाग्रतेने अभ्यास केला. 'परिस्थिती कशीही असो, मेहनतीला पर्याय नाही' हे त्याने आपल्या निकालातून सिद्ध केले आहे.

संघर्षातून उमलले यश
मखमलाबाद येथील वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्था संचलित आदर्श विद्यामंदिर शाळेत शिकणाऱ्या विशालच्या या यशाने संपूर्ण शाळा परिसर भारावून गेला आहे. आईच्या वेदना डोळ्यासमोर असताना मनाचे संतुलन राखून अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे सोपे नव्हते, मात्र विशालच्या जिद्दीपुढे संकटांनीही हार मानली.

सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव
विशालच्या या यशाबद्दल आदर्श विद्यामंदिरचे मुख्याध्यापक, त्याच्या वर्गशिक्षिका संध्या मोरे आणि संपूर्ण शिक्षक वृंदाने त्याचे कौतुक केले आहे. प्रतिकूल परिस्थितीतही डगमगून न जाता त्याने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ ठरणार आहे.

आईची सेवा हेच माझे पहिले कर्तव्य 
"आई आजारी असताना तिची सेवा करणे हे माझे पहिले कर्तव्य होते. त्याच कर्तव्याच्या जोरावर मला अभ्यासाची ऊर्जा मिळाली. हे यश माझ्या आईच्या कष्टाला आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला समर्पित आहे."
— विशाल ठाकरे (यशस्वी विद्यार्थी)
इतर बातम्या
Join Whatsapp Group