११ मे २०२६
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):= टीसीएस मधील बहुचर्चित लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिचा पोलीस कोठडीतील मुक्काम संपला आहे. तब्बल दोन महिना पोलिसांना गुंगारा देणाऱ्या गर्भवती निदा खानला नाशिकरोड न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, तिची रवानगी आता नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
पोलीस कोठडीची मुदत संपली
चार दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर निदा खानला आज सोमवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश केदार जोशी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निदा खान हिच्यावर असलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर सरकारी पक्ष आणि बचाव पक्षात जोरदार युक्तीवाद झाला होता . विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सरकारची बाजू मांडली. पोलीस कोठडी दरम्यान निदा आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली होती. या तपासात काही महत्त्वाचे दुवे हाती लागल्याचे समजते. निदा खानच्या वतीने ॲड. राहुल कासलीवाल यांनी काम पाहिले.
तपासाचे चक्र : कुटुंबासमोर झाली चौकशी
गेल्या चार दिवसांच्या कोठडीत पोलिसांनी निदा खानकडून गुन्ह्याशी संबंधित माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला. फरार असताना तिला कोणी आश्रय दिला आणि धर्मांतरण प्रकरणाचे धागेदोरे कोठे जोडलेले आहेत, यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले होते. कुटुंबातील सदस्यांसोबत समोरासमोर चौकशी करून पोलिसांनी अनेक विसंगती दूर केल्याचा दावा केला आहे.
आता मुक्काम 'मध्यवर्ती'मध्ये
संशयित निदा खान गर्भवती असल्याने तिच्या आरोग्याची आणि सुरक्षेची काळजी घेण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत. न्यायालयाने पोलीस कोठडी वाढवून न दिल्याने तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे. पुढील किमान १४ दिवस आता तिला नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील बराकीत काढावे लागणार आहेत.
Copyright ©2026 Bhramar