नाशिक शहरातील टीसीएस प्रकरणाणे राज्यातील संपूर्ण कॉर्पोरेट क्षेत्राची झोप उडाली आहे. मात्र टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणातील सर्वात मोठी घडामोड घडली आहे. टीसीएस कंपनीमधील महिला कर्मचाऱ्यांचे शोषण, सक्तीच्या धर्मांतराचे प्रयत्न, धार्मिक भावना दुखावणे, विनयभंग आणि मानसिक छळ यांच्याशी संबंधित दाखल झालेल्या नऊ प्रकरणांची एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचे मोठे धागे दोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
टीसीएस कंपनीतील फरार महिला आरोपी निदा खान हिच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश आले आहे. गेल्या २५ दिवसांपासून पोलीस तिच्या मागावर होते. अखेर नाशिक गुन्हे शाखा आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला नारेगाव भागातून ताब्यात घेतले. अटकेनंतर तिचा पहिला फोटो समोर आला आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 मार्चपासून फरार असलेल्या निदा खानचा, नाशिक पोलिसांचे दोन पथक शोध घेत होते. अखेर तिला छत्रपती संभाजीनगर येथील नरेगावमधील कैसर कॉलनीतील एका फ्लॅटमधून ताब्यात घेण्यात आले.
कैसर कॉलनीतील फ्लॅटमध्ये होता मुक्काम
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी निदा खान छत्रपती संभाजीनगरमधील कैसर कॉलनी येथील एका फ्लॅटमध्ये लपून बसली होती धक्कादायक बाब म्हणजे, ती एकटी नसून हिच्यासह त्या फ्लॅटमध्ये तिची आई, वडील, भाऊ आणि आत्या यांच्यासह एकूण पाच जण राहत होते. ती गेल्या चार दिवसांपासून नारेगावच्या कैसर कॉलनीतील या फ्लॅटमध्ये लपली होती. निदा वारंवार आपले लोकेशन बदलत असल्याने पोलिसांना तिला पकडण्यात अडचणी येत होत्या. मात्र पोलीस गेल्या दोन दिवसांपासून फ्लॅटवर नजर ठेवून होते. अखेर तिथून तिला ताब्यात घेण्यात आलं. काल रात्री निदा खान हिला नाशिक येथे आणण्यात आलं. आज तिला नाशिक येथील कोर्टात हजर करण्यात येण्याची शक्यता आहे.
अटकपूर्व जामीन फेटाळला;निदा खानच्या अडचणीत वाढ
२५ मार्चपासून फरार असलेल्या निदा खानला नाशिक रोड न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. अटक टाळण्यासाठी निदाने केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने २ मे २०२६ रोजी फेटाळून लावला. यापूर्वी २० एप्रिल रोजी न्यायालयाने तिला अंतरिम संरक्षण देण्यासही नकार दिला होता. विशेष तपास पथकाने (SIT) सादर केलेला तपास अहवाल आणि जामिनाला केलेला तीव्र विरोध यामुळे निदा खानच्या अडचणी वाढल्या आहेत. वारंवार जामीन अर्ज फेटाळला गेल्यामुळे आता पोलिसांनी तिच्या शोधासाठी कंबर कसली असून तपास अधिक तीव्र केला. नाशिकच्या कंपनीतील धर्मांतरण प्रकरणी निदा खानच्या आधी अनेक आरोपींना अटक करण्यात आली होती. त्याप्रकरणी चार मुख्य आरोपींना 18 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. ह्या आरोपींमध्ये रझा रफीक मेमन, तौसीफ बिलाल अत्तार, दानिश शेख आणि शाहरुख हुसेन शौकत कुरेशी यांचा समावेश आहे.
पुढील कारवाई काय?
अटकेनंतर निदा खानची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर तिला 'ट्रान्झिट वॉरंट'साठी छत्रपती संभाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. आता तिला नाशिकला आणले जाणार असून, आज तिला नाशिक न्यायालयात हजर केले जाईल. निदा खानच्या अटकेमुळे या प्रकरणातील इतर धागेदोरे आणि फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नेमके प्रकरण काय?
निदा खान ही टीसीएसची निलंबित कर्मचारी आहे. ती कंपनीच्या नाशिक युनिटमध्ये काम करत होती. महिलांवर लैंगिक अत्याचार करणे, त्यांना मानसिक छळ करणे आणि इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप तिच्यावर आहे. यापूर्वी पोलिसांनी याच प्रकरणात सहा कर्मचाऱ्यांना अटक केली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, निदा खान गेल्या अनेक दिवसांपासून फरार होती आणि नाशिक पोलिसांची 2 पथकं तिचा शोध घेत होती.
मोबाईल-डायरीमुळे उलगडणार गुपित ?
निदा खान विरोधात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आयटी कंपनीच्या नाशिक युनिटमधील कामाच्या वातावरणाबद्दल धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. फिर्यादी पक्षाच्या म्हणण्यानुसार, निदा खान हिने महिला सहकाऱ्यांवर इस्लामिक परंपरा स्वीकारण्यासाठी दबाव टाकला, ज्यात कपडे आणि आहाराच्या सवयी ठरवून देणे यांचा समावेश होता. विशेष सरकारी वकील अजय मिसार यांनी सादर केलेल्या पुराव्यानुसार, निदाने तक्रारदारांपैकी एकाला बुरखा आणि हिजाब दिला, तिला नमाज शिकवला आणि मोबाईल फोनवर इस्लामिक शिक्षणाशी संबंधित एक ॲप्लिकेशन इन्स्टॉल केले.
एवढंच नव्हे तर पीडितेचे नाव बदलून ‘हानिया’ ठेवण्याचा आणि तिला नोकरीसाठी मलेशियाला पाठवण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोपही आहे. तपासकर्त्यांच्या सांगण्यानुसार, निदा खानचा मोबाईल फोन आणि डायरी हस्तगत करण्यासाठी तिची कोठडीतील चौकशी आवश्यक आहे. कारण त्यातून बाहेरून मिळणाऱ्या निधीचे स्रोत आणि मालेगाव व मलेशियातील धर्मांतरण नेटवर्कशी असलेले मोठे संबंध उघड होऊ शकतात.