टीसीएस लैंगिक अत्याचार प्रकरण : मुख्य संशयित निदा खानचा अटकपूर्व जामीन फेटाळला
टीसीएस लैंगिक अत्याचार प्रकरण : मुख्य संशयित निदा खानचा अटकपूर्व जामीन फेटाळला
img
Chandrakant Barve



नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि अट्रोसिटी प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेली मुख्य संशयित निदा खान हिला नाशिकरोड न्यायालयाने मोठा दणका दिला आहे.

निदा खानने दाखल केलेला अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश केदार जोशी यांनी फेटाळून लावला आहे. या निर्णयामुळे निदा खानच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला असून, विशेष तपास पथकाच्या हालचालींना वेग आला आहे.

देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्याचे लैंगिक शोषण आणि अट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दानिश शेख आणि तौसिफ अख्तर हे मुख्य आरोपी असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, या संपूर्ण प्रकरणात त्यांना मदत करणारी आणि गुन्ह्यात सहभाग असलेली निदा खान ही गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे. तिने अटकेपासून वाचण्यासाठी २० एप्रिल रोजी नाशिकरोड न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

शुक्रवारी या अर्जावर न्यायाधीश केदार जोशी यांच्यासमोर सुनावणी झाली. निदा खानच्या वतीने ॲड. राहुल कासलीवाल यांनी युक्तिवाद करत अंतरिम जामिनाची मागणी केली. मात्र, विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी याला तीव्र विरोध दर्शवला. पीडितेवर झालेला अत्याचार, धर्मांतराचा दबाव आणि या कटात निदा खानची असलेली भूमिका पाहता तिला जामीन देऊ नये, असा दावा सरकारी पक्षातर्फे करण्यात आला. पीडितेच्या वतीने ॲड. मिलिंद कुरकुटे, ॲड. भूषण बाजपेयी, ॲड. नितीन पंडित, ॲड. योगेश शिरसाठ, ॲड. ऋषिकेश कातकडे, ॲड. ऋषी बलकवडे आणि ॲड. आदित्य डावखर या फौजफाट्याने बाजू मांडली होती.

न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निदा खानचा जामीन अर्ज फेटाळून लावला. ती गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत असून, तपासात सहकार्य करत नसल्याचे दिसून आले आहे. जामीन फेटाळल्याने आता पोलिसांच्या विशेष पथकाकडून निदा खानला कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group