नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी):-बहुचर्चित टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण व धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिला अटकेपासून संरक्षण देत छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्याप्रकरणी 'एमआयएम'चा नगरसेवक संशयित मतीन माजीद पटेल याला शुक्रवारी नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले.
संशयित मतीन पटेल याला न्यायालयाने नोटीस व समन्स बजावले होते. त्यानुसार त्याला ३१ जुलै रोजी न्यायालयात हजर राहणे बंधनकारक होते; मात्र तो गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. या वॉरंटची अंमलबजावणी करत नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर येथून त्याला ताब्यात घेऊन नाशिकमध्ये आणले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश केदार जोगळेकर यांच्या न्यायालयात मतीन पटेलच्या वतीने ॲड. प्रतिक ताजनपुरे यांनी युक्तिवाद केला.
देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात टीसीएस प्रकरणी २६ मार्च रोजी पहिला गुन्हा दाखल झाला होता. धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचा ठपका असलेली निदा खान तेव्हापासून फरार होती. २ मे रोजी नाशिकरोड न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर, मतीन पटेल याने सुचवलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील एका फ्लॅटमध्ये तिने आश्रय घेतला होता. नाशिक पोलिसांनी ७ मे रोजी तेथून निदाला ताब्यात घेतले होते. ७ जुलै रोजी तिला जामीन मंजूर झाला; मात्र गुन्हेगाराला आश्रय दिल्याप्रकरणी मतीन पटेल याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी नाशिक शहर पोलिस आयुक्तालयात मे महिन्यात मतीन पटेलची तब्बल आठ तास कसून चौकशी करण्यात आली होती आणि त्याचा मोबाइल जप्त करण्यात आला होता. या तपासादरम्यान पटेल आणि फ्लॅट मालक सहसंशयित हनिफ यांच्यातील फोनवरील संवादाचे महत्त्वाचे कॉल रेकॉर्डिंग पोलिसांनी पुरावा म्हणून सुरक्षित केले आहे. वॉरंटनुसार कारवाई करत गुरुवारी त्याला ताब्यात घेतल्यानंतर शुक्रवारी त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली.