गेल्या काही दिवसांपासून राज्यभर चर्चेत असलेल्या TCS कंपनीतील तरुणीवरील अत्याचार आणि कथित धर्मांतर प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानच्या समर्थनार्थ ‘मायनॉरिटी डिफेन्स कमिटी’ मैदानात उतरली असून, त्यांनी आरोपींवर होत असलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
इस्लाम पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी आमदार आसिफ शेख यांनी आरोपींच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर या प्रकरणावर मोठे वक्तव्य केले आहे. मुख्य संशयित निदा खानसह ७ आरोपींच्या बाजूने ‘मायनॉरिटी डिफेन्स कमिटी’ उभी राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
‘खरात प्रकरण’ दाबण्यासाठीच हे प्रकरण जाणीवपूर्वक पुढे आणण्यात आले असून, टीसीएस (TCS) प्रकरणात कोणतेही तथ्य नसल्याचा दावा शेख यांनी केला आहे. निदा खान यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले असून, न्यायालयात होणाऱ्या सुनावणीच्या वेळी आपण स्वतः हजर राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान , दुसरीकडे फरार आरोपीला आश्रय दिल्याप्रकरणी अडकलेले ‘एमआयएम’चे (MIM) नगरसेवक मतीन पटेल आज नाशिक पोलिसांसमोर हजर होण्याची शक्यता आहे.