शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून आता अनेक छोट्यामोठ्या कारणांतून अनेक गंभीर घटना घडत आहेत. अशीच एक धक्कदायक घटना आता समोर नाशिक मधून समोर आली आहे.
कौटुंबिक वादातून एकाने पत्नीसमोरच मेहुणीला संपवलं. नाशिकमधील देवळा तालुक्यातून ही धक्कादायक घटना घडली. भऊर फाटा परिसरात घडलेल्या या भयंकर प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. छाया ज्ञानेश्वर जाधव असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपी श्याम आगनदास माळी (रा. धोडांबे, ता. चांदवड) याला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मृताचे पती ज्ञानेश्वर जाधव यांच्या तक्रारीवरून देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
श्याम माळी आणि त्याची पत्नी माया यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सतत वाद सुरू होते. दारूच्या व्यसनासाठी तो पत्नीकडून पैसे घेत होता. त्यासाठी तिचा वारंवार छळ करत होता. याच छळाला आणि मारहाणीला कंटाळून माया माहेरी गेली होती. शुक्रवारी श्याम माळी याची समजूत काढण्यासाठी आणि वाद मिटवण्यासाठी छाया जाधव यांच्यासह पती, आई आणि भाऊ त्याच्या भऊर फाटा येथील घरी गेले होते.
वाद शांततेत सोडवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच अचानक परिस्थिती बिघडली. श्याम माळी याने अचानक हल्ला केला. चाकूने पत्नी माया हिला मारण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, हा प्रयत्न हाणून पाडल्यानंतर त्याने मेहुणी छाया हिला गाठलं. तिच्या छातीवर चाकूने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत छाया या जागीच कोसळल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या झटापटीत वाद सोडवताना सोनू कराटे हा देखील जखमी झाला आहे. दरम्यान, या प्रकरणात मृत छाया यांचे पती ज्ञानेश्वर जाधव यांनी देवळा पोलीस ठाण्यात धाव घेतली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.