नाशिक रोड : अंगावर वर्दी चढण्यापूर्वीच ‘खाकी’ची स्वप्नं धूसर; उष्माघाताने ४ महिन्यांच्या चिमुरडीचा दुर्दैवी अंत
नाशिक रोड : अंगावर वर्दी चढण्यापूर्वीच ‘खाकी’ची स्वप्नं धूसर; उष्माघाताने ४ महिन्यांच्या चिमुरडीचा दुर्दैवी अंत
img
Chandrakant Barve



नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी) :ज्या हातांनी उद्या समाजाचे रक्षण करण्यासाठी ‘खाकी’ वर्दी परिधान करण्याचे स्वप्न पाहिले होते, त्याच हातांवर आपल्या काळजाच्या तुकड्याला अखेरचा निरोप देण्याची वेळ एका दुर्दैवी मातेवर आली. पुणे जिल्ह्यातील इंदापूरहून लग्नसमारंभासाठी नाशिकला आलेल्या एका पोलीस कुटुंबातील अवघ्या चार महिन्यांच्या चिमुरडीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील गोथंडी येथील शुभम सतीश काटेकर आणि प्रतीक्षा शुभम काटेकर हे दांपत्य आपल्या चार महिन्यांच्या मुलीसह बुधवारी सायंकाळी वऱ्हाडासह  नाशिकमध्ये आले होते. सामनगाव रोड परिसरातील एका लॉन्सवर त्यांच्या चुलत काकांचे लग्न होते. इंदापूरहून खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करत असताना कडाक्याच्या उन्हाचा तडाखा या चिमुरडीला बसल्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रवासादरम्यान ती खेळत होती, मात्र दिवसभराच्या प्रखर उष्णतेमुळे ती काहीशी सुस्तावली होती.

लग्नघरातील गडबड, पाहुण्यांची लगबग आणि आनंदाच्या वातावरणात कुणालाही काळाच्या या घाल्याची चाहूल लागली नाही. पहाटे चारच्या सुमारास आई प्रतीक्षा यांना जाग आली. त्यांनी मुलीकडे पाहिले असता तिची कोणतीही हालचाल होत नव्हती. घाबरलेल्या आई-वडिलांनी तातडीने तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. क्षणात आनंदाच्या घरावर दुःखाची सावली पसरली आणि विवाहसोहळ्याचे वातावरण शोकमय झाले.

वर्दीची ओढ... अन् मातृत्वाचा आक्रोश

मृत चिमुरडीची आई प्रतीक्षा काटेकर यांची नुकतीच महाराष्ट्र पोलीस दलात मुंबई विभागासाठी निवड झाली होती. पोलीस भरतीत यश मिळवत त्यांनी ‘खाकी’ वर्दी परिधान करण्याचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले होते. मात्र, मुलगी अत्यंत लहान असल्याने तिच्या संगोपनासाठी त्यांनी सेवेत रुजू होण्यासाठी मुदत मागून घेतली होती. मातृत्व आणि कर्तव्य यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न सुरू असतानाच नियतीने त्यांच्या पदरातील अनमोल चिमुकला हिरा हिरावून नेला.

उष्माघाताची प्राथमिक चर्चा
नाशिकसह राज्यभरात सध्या तापमानाचा पारा चाळीशी पार गेला आहे. भीषण उष्णतेचा फटका या चिमुरडीला बसल्याची प्राथमिक चर्चा असून, नाशिक रोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group