अशोक खरात प्रकरणात केवळ लैंगिक शोषणच नाही, तर बँकिंग यंत्रणेलाही चुना लावल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे ३२ संशयास्पद खाती उघडून दिलेल्या आर्थिक रॅकेटचा पर्दाफाश करत पोलिसांनी सिन्नरमधील जगदंबा पतसंस्थेच्या व्यवस्थापकाला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे खरातच्या आर्थिक व्यवहारांचा संपूर्ण हिशोब आता पोलिसांच्या हाती लागणार असून तपासाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे.
भोंदू अशोक खरात प्रकरणात महिलांच्या लैंगिक शोषणासह आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. अशोक खरातने केलेल्या आर्थिक घोटाळा प्रकरणात सिन्नरमधील जगदंबा पतसंस्थेची भूमिका वादग्रस्त ठरल्याचे म्हटले जाते. याच जगदंबा पतसंस्थेचा व्यवस्थापक अविनाश कांडेकर याला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे या मोठ्या आर्थिक रॅकेटमध्ये नवे वळण आले आहे.
काय आहे प्रकरण
अशोक खरात याने भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या माध्यमातून कमावलेला पैसा कायदेशीर भासवण्यासाठी बँकिंग यंत्रणेचा गैरवापर केल्याचा संशय पोलिसांना होता. तपासादरम्यान, सिन्नरमधील जगदंबा पतसंस्थेत खरातशी संबंधित तब्बल ३२ संशयास्पद खाती आढळली आहेत. ही खाती बनावट कागदपत्रांच्या आधारे उघडण्यात आली असून, त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा विशेष तपास पथकाने (SIT) केला आहे. या आर्थिक व्यवहारांमध्ये व्यवस्थापक अविनाश कांडेकर याची भूमिका संशयास्पद आढळल्याने सिन्नर पोलिसांनी ही कारवाई केली.
कांडेकर याने नियमांना हरताळ फाळून खरातला ही खाती उघडण्यास आणि व्यवहार करण्यास मदत केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अटक केल्यानंतर कांडेकरला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता
पोलिसांकडून सध्या या ३२ खात्यांमधील प्रत्येक व्यवहाराची बारकाईने तपासणी सुरू आहे. या खात्यांमधून पैसे कुठे वळवण्यात आले आणि यात आणखी किती लोकांचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे. कांडेकरच्या चौकशीतून या आर्थिक रॅकेटचे आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.