आजकाल अंधश्रेद्धेच्या जाळयात ओढून भोंदू लोकांकडून होत असलेल्या अनेक फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. दरम्यान आता अघोरी पूजा, उतारे आणि जादूटोण्याची भीती दाखवत धुळे येथील एका महिलेकडून सुमारे १ लाख ६० हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याहून धक्कादायक म्हणजे पीडित महिलेच्या २१ वर्षीय मुलीला कुटुंबापासून दूर ठेवून तिचा जबरदस्तीने मांत्रिकाच्या मुलाशी साखरपुडा केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी नाशिक येथील संशयित मांत्रिक महिला सरिता मनोज जाधव आणि तिच्या साथीदारांविरोधात धुळे शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी संबंधित संशयितांना नाशिक येथून अटक केली आहे.
फिर्यादीनुसार, पीडित महिला धुळे येथे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. प्रकृती वारंवार बिघडत असल्याने आणि आर्थिक अडचणींमुळे ती चिंतेत होती. तिच्या दोन परिचित महिलांनी तिची नाशिकहून आलेल्या सरिता मनोज जाधव या महिलेशी ओळख करून दिली. जाधव हिने स्वतःकडे अघोरी पूजा व उतारे करण्याची शक्ती असल्याचे सांगत पीडित महिलेचा विश्वास संपादन केला.
पीडित महिलेच्या अंगावरून लिंबू फिरवणे, पाण्यात राख टाकून ते पिण्यास सांगणे, पेढा खायला देणे, तसेच “माझे सांगणे पाळले नाही तर आणखी वाईट होईल,” अशी भीती दाखवल्याचा आरोप आहे. त्यानंतर पीडितेच्या डोक्यातील केस उपटून स्मशानात पूजा करावी लागेल, असे सांगत नाशिक येथे अमावास्या आणि पौर्णिमेला उतारे करण्यासाठी बोलावण्यात आले. या विधीसाठी संशयित महिलेने १ लाख ५१ हजार रुपयांची मागणी केली. त्यापैकी पीडित महिलेने काही दिवसांनी १ लाख ३० हजार रुपये रोख दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
यासह अमावस्येच्या दिवशी पीडित महिलेला नाशिकच्या गंगाघाटाजवळील केवडीबन येथे नेण्यात आले. तेथे स्नान घालून लिंबू उतरवण्यात आला. त्या लिंबाचा रस डोळ्यात टाकण्यात आला. खोबरे व पेढा खायला दिल्यानंतर पीडितेला मळमळ व उलटी झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर तिला मुंबई नाका परिसरातील घरी नेऊन काळे तीळ आणि राखेच्या सहाय्याने अघोरी पूजा करण्यात आली. या वेळी आणखी ३० हजार रुपये जबरदस्तीने घेतल्याचा आरोप आहे.
स्वतःच्या मुलाशी जबरदस्तीने साखरपुडा
संशयित महिलेने पीडितेस तिच्या मुलीला धुळे येथील परिचित महिलेच्या घरी ठेवण्यास सांगितले. "चाळीस दिवस तिकडे जाऊ नका, तेथे दुष्ट शक्ती आहेत" अशी भीती दाखवण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. नंतर पीडितेच्या मुलीचे संशयित महिलेच्या मुलाशी लग्न लावून दिल्यास संकट टळेल, असे सांगण्यात आले. त्यानंतर मुलगी कुटुंबापासून दूर राहू लागली. पुढे तिचा साखरपुडा संशयित महिलेच्या मुलगा गणेश मनोज जाधव याच्याशी करून घेतल्याचा आरोप आहे. काही काळानंतर पीडित महिलेच्या कुटुंबीयांशी संपर्क बंद करण्यात आला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधला. समितीचे कार्यकर्ते रणजित शिंदे, नवल ठाकरे, भूषण पाटील, नितीन बागूल आदींनी पीडितेला पोलिसांत तक्रार देण्यासाठी मदत केली. त्यानंतर धुळे शहर पोलिसांत जादूटोणा विरोधी कायदा आणि इतर लागू कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. धुळे पोलिसांनी नाशिक पोलिसांच्या मदतीने संशयितांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंतकुमार भामरे करीत आहेत.