नवीन नाशिक (प्रशांत निरंतर) :- कोर्टात केस चालू असल्याच्या कारणातून कुरापत काढून तीन जणांनी मायलेकास कोयत्याने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना इंदिरानगर येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अभिषेक रवींद्र कळमकर (रा. दामोदर चौक, इंदिरानगर) हे आई, वडील, भाऊ व बहिणीसह राहतात. त्यांची लहान बहीण वैजापूर येथे सासरी राहते, तर मोठ्या बहिणीचा विवाह पाच वर्षांपूर्वी दीपक भाऊसाहेब चोथे (रा. अशोकनगर, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) यांच्याशी झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. सासरच्या लोकांकडून मानसिक व शारीरिक त्रास होत असल्यामुळे फिर्यादीची मोठी बहीण आठ-नऊ महिन्यांपासून फिर्यादीच्या घरी राहते. याबाबत तिने मालेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादीचा आरोपी दाजी दीपक चोथे हा बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करून त्यावर फिर्यादीची बहीण, आई, वडिलांविषयी अश्लील संदेश स्टेटसवर ठेवून फोनवरून शिवीगाळ करीत असे. दि. 13 एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास फिर्यादी हे घराबाहेर असताना आरोपी दाजी एमएच 17 सीई 4999 या क्रमांकाच्या वाहनावरून आलेले दिसले. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक सागर भिकन चव्हाण (रा. नांदूर नाका, नाशिक) व नितीन नवनाथ दांगट (रा. मु. पो. ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) हे एमएच 11 बीएच 0021 या क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर गाडीने आले. त्यांना पाहून फिर्यादी हे घरात जात असताना आरोपी दीपक चोथे व नितीन दांगट यांनी फिर्यादीला पकडून ठेवले व तुझे वडील कुठे आहेत, असे विचारू लागले.
त्यावर फिर्यादीने वडील बाहेरगावी गेल्याचे सांगितले. तेव्हा आरोपीने मोठमोठ्या आवाजात विनाकारण शिवीगाळ सुरू केली. याबाबत रोखले असता आरोपी दीपक चोथे याने फिर्यादीचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने त्याच्या ताब्यातून सुटण्याचा प्रयत्न केला असता दीपक चोथे याने फिर्यादीला नखाने ओरखडले. त्यावेळी दीपक चोथे याने दुसरा आरोपी सागर चव्हाण याला “कोयता काढ, आज याला मारून टाकतो,” असे म्हणाला. त्यावेळी चव्हाण याने त्याच्या सॅकमधील कोयता काढून चोथे याला दिला. चोथे याने हा कोयता फिर्यादीच्या डोक्यावर मारून दुखापत केली.
त्यावेळी फिर्यादीची आई व लहान भाऊ यांनी फिर्यादीला दीपक चोथे याच्या ताब्यातून वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोथे म्हणाला, “तुझ्या आईलाही मारून टाकतो,” असे म्हणून त्याने जमिनीवर पडलेला मोठा दगड उचलून फिर्यादीच्या आईच्या डोक्यावर फेकला. या आरडाओरडीमुळे फिर्यादीच्या बिल्डिंगमधील रहिवासी व आजूबाजूला राहणारे नागरिक जमा झाले. त्यांनी रक्तबंबाळ अवस्थेत पाहून तीनही आरोपींना पकडून ठेवले. त्यानंतर आरोपींजवळील सॅकची तपासणी केली असता त्यामध्ये पाच-सहा दगड, पेट्रोल भरलेल्या बाटल्या, तसेच आगपेटी असे साहित्य आढळून आले. त्यानंतर फिर्यादीचा भाऊ व मित्र हर्षल पाटील यांनी फिर्यादीला वक्रतुंड हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनार करीत आहेत.