कळवण (भ्रमर वार्ताहर) :- पूजाविधी करून पंधरा कोटी रुपयांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत मुंबईतील काही कुटुंबांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कळवण तालुक्यातील पिंपळे खुर्द येथील भोंदू हिराचंद शिवाजी बर्डे याच्यासह सहा जणांविरुद्ध अभोणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हिराचंद बर्डे याच्यासह तिघांना अटक केली आहे.
मुंबईतील बोरिवली येथील राजाराम सीताराम शेलार यांची मित्रांमार्फत हिराचंद बर्डे याच्याशी ओळख झाली. मंत्र-तंत्र व पूजाविधी करून पैशांचा पाऊस पाडता येतो, असा दावा बर्डे याने केला. सुरुवातीला पाच जणांकडून प्रत्येकी एक हजार रुपये घेतल्यानंतर पूजा करून दोन लाख रुपये झाल्याचे भासविल्याने पीडितांचा त्याच्यावर विश्वास बसला. त्यानंतर पाच जणांनी 11 लाख रुपये दिल्यास 15 कोटी रुपयांचा ‘पैशांचा पाऊस’ पाडण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यानुसार रोख व ऑनलाईन पद्धतीने 10 लाख 95 हजार रुपये उकळल्याचा आरोप आहे.
पूजेदरम्यान नारळातून स्फोट घडवून चमत्काराचा आभास निर्माण करण्यात आला. त्यानंतर तीन कोटी रुपयांचा ‘पैशांचा पाऊस’ पडल्याचे सांगत नोटांनी भरलेली गोणी पीडितांच्या ताब्यात देण्यात आली. गोणी सात दिवस उघडू नये; अन्यथा देवाचा कोप होईल, अशी भीती दाखविण्यात आली; मात्र संशय आल्याने गोणी उघडली असता बंडलांमध्ये केवळ वरच्या नोटा खर्या असून, आतील नोटा खेळण्यांमधील बनावट असल्याचे आढळले.