नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- आर्थिक विवंचनेत असलेल्या एका महिलेला पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून सापुतार्याच्या डोंगरदर्यात तोतया पोलिसांच्या मदतीने साडेपाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.
भोंदूगिरी, जादूटोणा आणि पोलिसांचा बनाव करून रचलेला हा क्राईम ड्रामा पाहून नाशिकचे पोलीस प्रशासनही चक्रावून गेले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, यामागे एखादे आंतरराज्य रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
डोंबिवलीच्या उमेशनगर भागात राहणार्या 48 वर्षीय व्यावसायिक महिलेवर 40 लाखांचे कर्ज होते. त्या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी धडपडत असताना, मुंबईतील चेंबूर येथील बाबूराव जाधव याने सातपूरच्या विठोबा वाल्मीक जाट (वय 65, रा. पूनम पार्क, सातमाऊली चौक, सातपूर) या संशयित भोंदूबाबाचे नाव सुचविले. हा जाट बाबा दैवी शक्तीने पैशांचा पाऊस पाडतो, तुझे सर्व कर्ज फिटेल, असा दावा जाधवने केल्यामुळे ही महिला या आशेने नाशिकला आली व संशयिताला भेटली. सातपूरच्या अमृत गार्डन येथे संशयित विठोबा जाटने सुरुवातीला 11 लाखांची मागणी केली; पण व्यवहार 5 लाख 60 हजार रुपयांमध्ये ठरला.
अमृत गार्डन परिसरात प्राथमिक पूजा करून भोंदू टोळीने महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर मुख्य विधीसाठी त्यांना सापुतार्याच्या निर्जन स्थळी नेले. तेथे विठोबा जाटने मंत्रोच्चार करून दोन कोटी रुपये आले आहेत, असे सांगत पैशांच्या बंडलने भरलेल्या बॅगा महिलेला दुरून दाखविल्या. ही महिला या नोटा घेण्यासाठी पुढे सरसावणार, इतक्यात दबा धरून बसलेल्या चार तोतया पोलिसांनी तेथे एन्ट्री केली. येथे दुचाकीचोर आले आहेत, तुमची झडती घ्यावी लागेल, अशी बतावणी करीत या चौघांनी महिलेला धमकावले. आपण संकटात सापडलो, असे वाटून ही महिला घाबरली.
याचाच फायदा घेत विठोबा जाट व बाबूराव जाधव (रा. मान खुर्द, चेंबूर, मुंबई) व त्यांचे चार अनोळखी साथीदार यांनी संगनमत करून ‘मॅटर सेटल्ड’ करण्याचे नाटक केले आणि पीडित महिलेकडून जास्तीचे 15 हजार रुपये फोन पेद्वारे तथाकथित पोलीस साथीदारांकडून एकूण 5 लाख 60 हजार रुपये घेऊन ही टोळी पसार झाली; मात्र परतीच्या प्रवासात तेच कथित पोलीस पुन्हा दिसल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात विठोबा जाट, बाबूराव जाधव यांच्यासह चार अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सातपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस पोलीस निरीक्षक बुवा करीत आहेत.