नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) : जुन्या वादाची कुरापत काढून एका २१ वर्षीय तरुणावर आधी रोकडोबावाडी भागात आणि त्यानंतर तो उपचार घेत असताना थेट बिटको रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात घुसून कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना ८ एप्रिल रोजी घडली. या हल्ल्यात दीपक अनिल गांगुर्डे (वय २१) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक गांगुर्डे हा रोकडोबावाडी, देवळालीगाव येथे आपल्या मामेभावाकडे राहून मजुरी करतो. आरोपी दीपक चटोले याच्याशी वर्षापूर्वी झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आला. बुधवारी सायंकाळी ५:३० च्या सुमारास दीपक रिक्षा पाहण्यासाठी थांबला असताना दीपक चटोले, सनी चटोले आणि संदीप चटोले यांनी त्याला गाठले.
"तुला जिवंत सोडत नाही" असे म्हणत आरोपींनी घरातून कोयते आणून दीपकच्या डोक्यात गंभीर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दीपकला नातेवाईकांनी उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र, आरोपींचा राग शांत झाला नव्हता. रात्री ९:३० च्या सुमारास जेव्हा दीपक बेडवर झोपलेला होता, तेव्हा संदीप चटोले हातात कोयता घेऊन थेट रुग्णालयात शिरला आणि त्याने दीपकच्या मानेखाली वार करून त्याला पुन्हा जखमी केले.
कर्मचाऱ्यांचे धाडस
रुग्णालयात हल्ला होत असताना तेथे उपस्थित असलेले सफाई कामगार राम निवृत्ती शिंदे, सुरक्षा रक्षक दीपक भोसले, मायकल निकाळजे आणि परिचारिका कावेरी नेहे यांनी अत्यंत धाडसाने हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केल्याने आणि प्रतिकार केल्याने संशयित तेथून पसार झाले. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार दीपक चटोले, सनी चटोले आणि संदीप चटोले यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक माळी आणि हवालदार गायकवाड या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.