४ मे २०२६
ज्याला मैत्री समजलं, तेच नातं काळ बनून समोर येईल असं त्या कुटुंबाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. नाशिकच्या दुगाव परिसरातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला नशेच्या आहारी लावल्याचा आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात संबंधित तरुण आणि त्याच्या पालकांविरुद्ध बलात्कार व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेने नाशिक हादरले आहे. सुरुवातील तर साधी मैत्री वाटणार हा संबंध पुढे गंभीर आरोपांमध्ये बदलला आहे. या घटनेने एक कुटुंब पूर्णपणे हादरले आहे.
नेमक प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, दुगाव परिसरातील एका शिक्षण संस्थेत शिकत असलेल्या 17 वर्षीय मुलीची ओळख ही 21 वर्षीय तरुणाशी झाली होती. पाहता पाहता काही महिन्यांत दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांचे संबंध हे प्रेमप्रकरणात बदलले. मात्र या दोघांच्या नात्याचा परिणाम अतिशय धोकादायक ठरला असा आरोप चक्क मुलीच्या आईने केला आहे.
काय म्हणाली तरूणीची आई?
आईच्या तक्रारीनुसार, त्या तरुणाने मुलीला अत्यंत चुकीच्या सवयींकडे वळवले होते. ज्यात त्याने तिला नशेच्या आहारी नेले आणि त्याच अवस्थेचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचारही केले असा आरोप आहे. ती घटना एका कारमध्ये घडल्याचे सांगण्यात येत आहेत. त्यानंतरही तो तरुण मुलीच्या घरी वारंवार येत राहिला आणि तेथेही नशा करत असल्याचे समोर आले होते. धक्कादायक गोष्ट म्हणजे या सर्व प्रकारासाठी मुलीने चक्क घरातील मोठी रक्कम खर्च केल्याचे समोर आले.
पण जेव्हा आईने त्याबाबत मुलीला विचारले तेव्हा तिने त्या तरुणाशी लग्न करण्याची इच्छा ही आईला व्यक्त केली. त्या गोष्टीमुळे संपूर्ण सदस्यांमध्ये तणाव निर्माण झाला. तरुण आणि तरुणीच्या घरचे हे सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचे सांगितले जात आहेत. तरीसुद्धा अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या नावाखाली चुकीच्या मार्गावर नेल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे. सध्या या प्रकरणी संबंधित तरुण आणि त्याच्या पालकांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात बलात्कार आणि पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून पुढील कारवाई सुरु केली आहे.
Copyright ©2026 Bhramar