नाशिक ; चोरट्यांकडून मालेगावमध्ये 7 मोटारसायकली हस्तगत
नाशिक ; चोरट्यांकडून मालेगावमध्ये 7 मोटारसायकली हस्तगत
img
Nandini khandare More


नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- मालेगाव शहरासह नजीकच्या तालुक्यांमध्ये मोटारसायकलचोरीचे वाढते गुन्हे लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार मालेगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या चोर्‍यांचा समांतर तपास करीत असताना दोघे मोटारसायकलचोर त्यांच्या हाती सापडले. पोलीस चौकशीत त्यांनी आणखी दोघा सहकारी चोरट्यांची नावे सांगितली. त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण 7 मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत, तसेच पोलिसांनी एकूण 18 मोटारसायकली हस्तगत केल्या असून, ज्यांच्या मोटारसायकली चोरीस गेल्या आहेत, त्यांनी कागदपत्रांसह आयेशानगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी हे मोटारसायकल चोर्‍यांचा समांतर तपास करीत असताना गुप्त खात्यामार्फत माहिती मिळाली, की मोसम पूल परिसरात दोन संशयित चोरीच्या मोटारसायकली घेऊन येणार आहेत. त्यानुसार सापळा रचला असता साद मोहंमद इफान (वय 24, रा. रजा चौक) आणि मोमिन महंमद दानिश (रा. रमजानपुरा, मालेगाव) हे पोलिसांच्या हाती सापडले. त्यांच्याकडील हिरो पॅशन प्रो मोटारसायकलीच्या कागदपत्रांबाबत विश्‍वासात घेऊन चौकशी केली असता ही मोटारसायकल नया इस्लामपुरा, भागातून चोरल्याचे त्यांनी कबूल केले. याबाबत आयेशानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

या दोघांची आणखी चौकशी केली असता त्यांनी त्यांचे साथीदार हमजा इस्तियाक अहमद (वय 20, रा. मौलाना उमरेन चौक, गुलाब पार्क) आणि सय्यद एजाज सय्यद यासीन (वय 19, रा. नवीन फरानमागे, गुलाब पार्क, मालेगाव) यांची नावे सांगितली. या चौघांनी मालेगाव शहर व ग्रामीण भागातून विविध ठिकाणांहून सात मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्यात 2 हिरो सीडी डॉन, 1 हिरो पॅशन प्रो, 1 होंडा युनिकॉन, 1 होंडाशाईन, 1 विक्रांत व्ही-12 आणि 1 सुपर स्प्लेंडर असा 3 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केला. यामुळे आयेशानगर व रमजानपुरा पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले मोटारसायकलचोरीचे 2 गुन्हे उघडकीस आले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेने गेल्या काही दिवसांत मालेगाव शहरातून चोरीस गेलेल्या 18 मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. त्यामुळे अटक केलेल्या आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मालेगाव शहर व ग्रामीण भागातील ज्या नागरिकांच्या मोटारसायकली चोरीस गेल्या आहेत, त्या नागरिकांनी गाडीच्या कागदपत्रांसह आयेशानगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच नागरिकांनी यापुढे जुनी मोटारसायकल खरेदी करताना मूळ कागदपत्रांची पडताळणी करूनच दुचाकी खरेदी करावी, कोणीही संशयित व्यक्ती मोटारसायकल कमी किमतीत, विना नंबरप्लेट किंवा बनावट नंबर प्लेट लावून गाडी विकत असल्याचा संशय आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेने केले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group