भयंकर ! नाशिकच्या ''या'' परिसरात सुटकेसमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
भयंकर ! नाशिकच्या ''या'' परिसरात सुटकेसमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
img
Nandini khandare More

गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक शहरातही मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. सध्या नाशिक शहरात आगामी कुंभमेळ्याची धामधूम असतानाच आता तपोवन मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ,आज (मंगळवारी)  तपोवन  येथील केवडी बन परिसरात असलेल्या कृषी गो सेवा ट्रस्ट गोशाळेजवळ एका सुटकेसमध्ये आणि गोणीत अत्यंत क्रूरपणे भरून ठेवलेला दुर्गंधीयुक्त मृतदेह आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

आज सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. परिसरात काम करणाऱ्या ग्लोबल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अचानक तीव्र दुर्गंधी येऊ लागली. संशय आल्याने कर्मचाऱ्यांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता, त्यांना एक संशयास्पद सुटकेस व गोणी दिसून आली. ती उघडून पाहिली असता त्यात मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. कर्मचाऱ्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली असून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. 

दरम्यान, मृतदेह सुटकेसमध्ये गोणीत भरून फेकण्यात आल्याने ही स्पष्टपणे हत्येची घटना असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब झालेली असून तीव्र दुर्गंधी सुटली आहे. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असता सदर मृतदेह महिलेचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपासाच्या अनुषंगाने तपासाची चक्रे फिरवली. याशिवाय घटनास्थळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते.

तसेच, मृत्यूचे नेमके कारण आणि मृत्यू कधी झाला, हे शोधण्यासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तसेच या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी परिसरातील आणि जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. सिंहस्थाच्या कामांमुळे सध्या तपोवन परिसरात मजुरांची आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते, अशा गजबजलेल्या भागात सुटकेसमध्ये गोणीत भरलेला मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस सध्या सर्व बाजूंनी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group