नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथेनवीन बंगल्यात राहण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून आते भावाने मामेभावांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली.या हल्ल्यात दोन तरुण जखमी झाले असून सिन्नर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ओंकार ज्ञानेश्वर शिंदे (वय 21, रा. कुंदेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत समाधान मच्छिंद्र जपे (वय 19, रा. कुंदेवाडी, ता. सिन्नर) यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी ओंकार शिंदे हा फिर्यादीचा आते भाऊ असल्याचे पोलिसांनी सांगितले. फिर्यादी समाधान जपे यांनी नुकताच नवीन बंगला बांधला असून ते तेथे राहण्यास जाणार असल्याच्या कारणावरून आरोपीने वाद घालत कुरापत काढली. कुंदेवाडी शिवारात तू नवीन बंगल्यात राहण्यासाठी जायचे नाही, असे म्हणत आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यानंतर वाद वाढून हाणामारी झाली.
यावेळी आरोपीने जीवे मारण्याच्या उद्देशाने समाधान जपे यांच्या पोटावर धारदार शस्त्राने वार केला. समाधान यांनी वार अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोटाला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, भांडण सोडवण्यासाठी आलेले समाधानचे भाऊ गणेश मच्छिंद्र जपे यांच्यावरही आरोपीने धारदार शस्त्राने हल्ला केला. गणेश यांच्या पोटाला दुखापत झाली असून आरोपीने दोघांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी ओंकार शिंदे याला अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.