भाजीपाला कॅरेटच्या आड जिवंत वन्यजीव आणि पक्ष्यांची तस्करी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजीपालाच्या नावाने अशाप्रकारे वन्यजीव आणि प्राण्यांची तस्करी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) आणि वन विभागाने अत्यंत गुप्त माहितीच्या आधारे संयुक्त मोहीम राबवून वन्यजीवांची मोठी तस्करी रोखली. या कारवाईत तब्बल 23 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना माहिती मिळाली की, धुळे–सुरत महामार्गावरून प्रतिबंधित वन्यजीवांची वाहतूक करणार आहे. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पथक रवाना करण्यात आले.विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील बर्डीपाडा टोलनाका येथे नाकाबंदी करत असताना संशयित आयशर वाहन तिथे आलं. या वाहनाला थांबवून तपासणी केली असता, भाजीपाला कॅरेटच्या आड जिवंत प्राणी आणि पक्षी लपवून ठेवलेले आढळले.
वाहनातील चालकासह तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे शहजाद अहमद अतिक अहमद (वय 47), मोमीन मोहम्मद मोईन समसुल हक (वय 32) आणि शेख सोहेल शेख अफजल कुरेशी (वय 24) अशी सांगितली. ही सर्व आरोपी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
चौकशीत आरोपींनी मालेगाव येथील काही व्यक्तींनी ही वन्यजीवांची खेप गुजरातमधील बडोदा येथे पोहोचवण्यासाठी दिल्याची कबुली दिली. कारवाईदरम्यान वाहनातून 5 कोल्हे, 99 अलेक्झांड्रीन जातीचे हिरवे पोपट आणि 190 तितर पक्षी जिवंत अवस्थेत आढळून आले. सदर वन्यजीवांना तात्काळ वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.