नाशिक : मनपाच्या सफाई कर्मचार्‍याने केला 18 लाखांचा अपहार
नाशिक : मनपाच्या सफाई कर्मचार्‍याने केला 18 लाखांचा अपहार
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- मालमत्ता करदात्यांकडून थकबाकीची 17 लाख 63 हजार रुपयांची रक्कम रोख स्वरूपात घेऊन ती स्वत:कडे ठेवून त्या रकमेचा अपहार करणार्‍या मनपाच्या सफाई कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



याबाबत महानगरपालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयाचे सहाय्यक अधीक्षक उदय निंबाजी खैरनार यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की संशयित मनीष अशोक जाधव हा मनपाच्या पंचवटी विभागीय कार्यालयांतर्गत सफाई कर्मचारी म्हणून काम करतो. दि. 10 सप्टेंबर 2025 ते दि. 19 जानेवारी 2026 यादरम्यान पंचवटी विभागीय कार्यालयांतर्गत असलेल्या घनकचरा विभागात सफाई कर्मचारी असलेल्या मनीष जाधव याने पंचवटी विभागीय कार्यालयांतर्गत असलेल्या फिर्यादीत नमूद मालमत्ता करदात्यांकडून थकबाकीची रक्कम रोख स्वरूपात स्वत:कडे ठेवून त्या बदल्यात महानगरपालिकेच्या विविध भरणा केंद्रांत स्वत:च्या नावे बँक खात्याचे चेक जमा करून पावती स्वीकारली.

सदरचे सर्व चेक हे खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याने न वटता परत आल्याचे प्राथमिक चौकशीअंती आढळून आले. सफाई कर्मचारी मनीष जाधव याने अपखुशीने स्वत:च्या फायद्याकरिता शासनाच्या 17 लाख 63 हजार 251 रुपयांची आर्थिक फसवणूक करून अपहार केला आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group