नाशिक : त्रिमूर्ती चौकात घराचा कडीकोयंडा तोडून 23 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास
नाशिक : त्रिमूर्ती चौकात घराचा कडीकोयंडा तोडून 23 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास
img
Prashant Nirantar
नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- घरातील कुटुंबीय घराच्या दुसर्‍या मजल्यावर झोपण्यासाठी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरातील 23 तोळे सोन्याचे, चांदीचे दागिने व रोकड असा साडेदहा लाख रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेल्याची घटना त्रिमूर्ती चौकात घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विजय बाळासाहेब घोटेकर (रा. शिवशक्तीनगर, त्रिमूर्ती चौक, सिडको) हे दि. 8 एप्रिल रोजी रात्री कुटुंबीयांसह घरातील सर्व जण घराच्या दुसर्‍या मजल्यावर झोपण्यासाठी गेले होते. रात्री 12 ते पहाटे पाच वाजेच्या दरम्यान कधी तरी अज्ञात चोरट्याने घोटेकर यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला.

त्यानंतर घरातील बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून त्यात असलेले 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे 30 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे आणखी एक मंगळसूत्र, 1 लाख 60 हजार रुपये किमतीचे 40 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 60 हजार रुपये किमतीची 15 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 40 हजार रुपये किमतीची 10 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 1 लाख 60 हजार रुपये किमतीचा 40 ग्रॅम वजनाचा सोन्याचा पोहेहार, 60 हजार रुपये किमतीची 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, 60 हजार रुपये किमतीची 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, 1 लाख रुपये किमतीच्या 25 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पाच अंगठ्या, 80 हजार रुपये किमतीचे 20 ग्रॅम वजनाचे 4 जोड कानातील झुबे, 8 हजार रुपये किमतीच्या दोन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या नथी, 48 हजार रुपये किमतीचा 12 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, 7 हजार 200 रुपये किमतीच्या 120 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या साखळ्या, 4 हजार 800 रुपये किमतीचे 80 ग्रॅम वजनाचे चांदीचे जोडवे व 80 हजार रुपयांची रोकड असा एकूण 10 लाख 48 हजार रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला.

या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पडोळकर करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group