प्रेमात लोक आंधळी होतात आणि सारी नातीच विसरतात. प्रेमात कोणी जीव दिला तर कोणी जीव घेतला. मग कोणी वडिलांचा जीव घेतला कोणी आईचा जीव घेतला. पण एका घटनेने सगळेच सुन्न झाले आहे. आईचं कौतुक करावं तितकं कमीच असतं पण एका महिलेने आई या शब्दाला नात्याला काळिमा फासला आहे. प्रेमात आंधळ्या झालेल्या एका मातेने तिच्या सहा वर्षाच्या मुलाचा जीव घेतला आहे. आणि हे कृत्य तिने तिच्या प्रियकरासोबत मिळून केलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील खेड तालुक्यातील कुरुळी येथे ही घटना घडली. 27 वर्षीय आई बसरिन मेहबूब शेख हिचे आरोपी राम विनायक कजेवाड याच्याशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात तिचा ६ वर्षांचा मुलगा आवेज मेहबूब शेख हा अडथळा ठरत होता. म्हणून 4 एप्रिलच्या रात्री साडे अकराच्या सुमारास आईने प्रियकराच्या मदतीने आवेजचा जीव घेतला. बाथरुममधील पाण्याच्या बादलीत डोके बुडवून नंतर डोके भिंतीवर आणि जमिनीवर आपटून त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली.
हत्येनंतर पुरावे मिटवण्यासाठी आरोपींनी या घटनेला नैसर्गिक मृत्यूचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. यासाठी आई आवेजचा मृतदेह माहेरी म्हणजे बीडला घेऊन गेली. हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला असं सांगून अंत्यविधी करण्याचं तिने ठरवलं. आईच्या वडिलांनी पतीच्या कुटुंबियांना अंत्यविधीसाठी बोलवले. त्यावेळी आवेजच्या आजोबांना संशय आला, त्यांनी परळी पोलिसांकडे तक्रार केली आणि शवविच्छेदन अहवालात आईचं आणि प्रियकराचे बिंग फुटले.
बसरीन आणि मेहबूब यांचा दहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना तीन मुलं आहेत. मात्र त्यांच्या संसारात चार वर्षांपूर्वी मिठाचा खडा पडला. त्यानंतर त्यांच्याच गावातील पतीचे मित्र रामच्या संपर्कात ती आली. दरम्यान बसरीन पती पासून दुरावली. दोन मुलं पतीसोबत राहत होती तर बसरीनसोबत आवेज राहत होता. दरम्यान बसरीन आणि रामचे प्रेमसंबंध जुळले. अलीकडे म्हणजे चार महिन्यांपूर्वी बसरीन पुण्याच्या खेड तालुक्यातील कुरळीत एकत्र राहत होते. मात्र मुलगा अडसर ठरेल म्हणून या दोघांनी त्याचा जीव घेतला. आता आईला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात मात्र तिचा प्रियकर फरार झाला आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.