आजकाल गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली असून या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. अनेक मर्डर च्या घटना देखील सर्रास पणे घडत आहेत. अशीच एक थरारक घटना समोर आली आहे. एका बापानेच आपल्या नवविवाहित मुलीची थरारक हत्या केल्याची घटना घडली आहे.
नवविवाहित तरुणी लग्नाच्या सहाव्याच दिवशी माहेरी परतली. चुलत भावासोबतच्या अनैतिक संबंधामुळं तिनं सासरी जाण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या वडिलांनीच तिचा काटा काढला. शीर धडावेगळं केलं आणि मध्य प्रदेशातून दुचाकीवरून येत बुलढाण्याच्या राजुरा शिवारात टाकलं. एलसीबीच्या पथकानं या भयंकर प्रकरणाचा छडा लावला. ऑनर किलिंगच्या भयंकर प्रकरणाने बुलढाण्यात खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे.
दरम्यान, मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी कोणताही ठोस पुरावा मिळत नव्हता. अशातच 1 मे रोजी म्हणजेच घटनेच्या सहाव्या दिवशी मध्यप्रदेशातील खकनार पोलीस स्थानकात 27 वर्षीय शिवानीच्या मिसिंगची तक्रार दाखल झाली. तिच्या वडिलांनी बापूराव नत्थू कळमेकर (वय 55) यांनीच तक्रार दाखल केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे यांना मिळाली. त्यानंतर लगेचच सपकाळे यांनी पथकासोबत मध्य प्रदेश गाठलं.
पोलिसांनी 2 दिवस आरोपी बापूराव कळमेकर आणि मुलगा अजय कळमेकर यांच्यावर पाळत ठेवली. त्यानंतर विश्वासात घेऊन चौकशी केली असता बापूराव याने गुन्ह्याची कबुली दिली. वडिलाने दिलेल्या माहितीनुसार, शिवानीचे त्याच्या मोठ्या जावयासोबत अनैतिक संबंध होते. ते प्रकरण निपटारा होत नाही तोच तिचे चुलत भावासोबत सूत जुळलं. एवढं सगळं झाल्यानंतर समाजात बदनामी नको म्हणून तिचे विदर्भातील अमरावती जिल्ह्यात धारणी येथे लग्न लाऊन दिले.
लग्नानंतर शिवानी माहेरी आली होती. नवरा तिला न्यायला आला असतानाच सर्व पाहुणे घराबाहेर झोपले होते. तेव्हा शिवानीने पुन्हा तिचा चुलत भाऊ अरुणला घरात बोलावलं. नको त्या अवस्थेत असतानाच वडिलांनी पाहिलं. त्यानंतर रागाच्या भरात लोखंडी रॉडने शिवानीवर वार करून तिला ठार केलं, असा कबुली जबाबच आरोपी बापाने दिला.
खुनाच्या दुसऱ्या दिवशी शिवानीचे प्रेत एका पोत्यात टाकून बुलढाणा जिल्ह्यातील जळगावच्या राजूर येथील जंगलात टाकले. ओळख पटू नये म्हणून तिथे तिचे शीर धडावेगळे केले, डोक्यावरचे केस कापले, कान, नाक कापून हातावर गोंदलेले अरुण नाव देखील कोयत्याने मिटवले आणि पेट्रोल टाकून प्रेत पेटवून दिले. अर्धवट जळालेल्या अवस्थेत शिवानीचा मृतदेह घेऊन पोलिसांनी तपास चक्रे फिरवत शिवानीचा खून करणाऱ्या बापाला आणि मदत करणाऱ्या भावाला मध्यप्रदेश मधून अटक केली आहे.
हत्येच्या वेळी घटनास्थळावर हजर असलेला अरुण अद्याप पोलिसांना सापडला नाही. त्यामुळे या प्रकरणाला डबल मर्डर मिस्ट्रीची किनार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे अरुणचा शोध देखील बुलढाणा पोलिस घेताना दिसत आहेत. या प्रकरणातील खरी कहाणी अरुण हाती लागल्यानंतर स्पष्ट होणारच आहे. मात्र अरुणचाच पत्ता लागत नसल्याने अरुण सोबतही शिवानी प्रमाणे काही अनुचित तर घडलं नाही ना? असा प्रश्न निर्माण होतोय.